अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शेतकऱ्यांना जबरदस्तीने सौरऊर्जा थोपवण्याचा प्रयत्न सुरू असून, अदानी समूहाच्या सौरऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याचा गंभीर आरोप बळीराजा शेतकरी संघटनेने केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अदानींच्या वीज खपवण्याची जबाबदारी घेतली असल्याचा दावा करत, अशा जबरदस्तीला शेतकरी मुळीच सहन करणार नाहीत, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर पंजाबराव पाटील यांच्यासह विश्वास जाधव, चंद्रकांत यादव, आनंदराव थोरात, पोपटराव जाधव, दीपक पाटील, उत्तम खबाले यांची स्वाक्षरी आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सौरऊर्जेच्या नावाखाली शेतकऱ्यांना जबरदस्ती वीज योजना लादली जात आहे. पूर्वी हक्काची, नियमित वीज मिळत असताना आता स्मार्ट मीटर आणि महागडी सौर ऊर्जा यांचा बोजा शेतकऱ्यांवर लादला जातो आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, राज्यात एमआयडीसी, उद्योग समूह आणि कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत, मग त्यांना ही सौरऊर्जा का दिली जात नाही? उलट शेतकऱ्यांना जुनी वीजच बंद करून सौरऊर्जेच्या नावाखाली जास्त दराने वीज विकली जात आहे. शिवाय, स्मार्ट मीटर लावून जबरदस्तीने देयक वसूल करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
राज्य सरकारने जर वेळेवर हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना पारंपरिक हक्काची वीज उपलब्ध करून दिली नाही, तर बळीराजा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा निर्वाणीचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण राज्यभर तीव्र असंतोष उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.