WhatsApp

महिलांशी संबंध, विश्वासघात आणि हत्या! नराधमाचं भीषण प्रकरण उघड

Share

अकोला न्यूज नेटवर्क
जळगाव : अमळनेर तालुक्यातील जंगलांमध्ये महिलांच्या हत्या करून मृतदेह पुरण्याचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या भीषण प्रकरणात अनिल संदानशिव या ३२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध खून आणि फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. पोलिसांनी जेव्हा आरोपीचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासला, तेव्हा त्याने अनेक महिलांशी सातत्याने संवाद साधल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही हत्या केवळ दोनच महिलांची नाही, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली असून, आता तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.



अनेक महिलांशी संपर्क, पण त्या जिवंत आहेत का?
पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलचा तपशील घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याने अनेक विवाहित महिलांशी फोनवरून संभाषण केल्याचे स्पष्ट झाले असून, त्या सर्व महिलांशी तो पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने संवाद साधायचा. आता त्या महिला जिवंत आहेत का, हे तपासण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या महिलांचे ठिकाण शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अशा पद्धतीने करायचा फसवणूक आणि हत्या
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अनिल संदानशिव विवाहित महिलांशी जवळीक साधायचा. गोड बोलून विश्वास संपादन करायचा. त्यानंतर त्यांना जंगलात बोलावून शारीरिक संबंध ठेवायचा आणि नंतर दगडाने ठेचून हत्या करायचा. सध्या दोन महिलांचे मृतदेह जंगलात सापडले असून, आरोपीने आणखी खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते.

दुप्पट पैसे मिळवून देतो म्हणत महिलांना फसवत होता
प्राथमिक चौकशीत आरोपीने कबूल केले आहे की तो महिलांना ‘दुप्पट पैसे मिळवून देतो’ असे आमिष दाखवून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचा. ही आर्थिक फसवणूक त्याच्या हत्येच्या योजनांचा एक भाग होती का, हेही तपासलं जात आहे. पोलिसांकडून आरोपीच्या मागील सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरू
या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिल संदानशिवने ज्या-ज्या महिलांशी संपर्क साधला होता, त्या सर्वांचा मागोवा घेतला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिक खोलवर नेण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!