WhatsApp

पुन्हा एका दलित युवकास मारहाण, खामगाव तालुका पुन्हा हादरला

Share

अकोला न्यूज नेटवर्क
बुलढाणा : खामगाव तालुक्यात पुन्हा एकदा दलित युवकावर जातीय पातळीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उसनवारीच्या रकमेवरून वाद झाल्यानंतर तिघांनी एका दलित युवकाला लाकडी दांडे, दगड आणि लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या या युवकावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.



ही घटना खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथे घडली असून, अजय संजय सोनटक्के (वय २४, रा. पाळा खडकी) या दलित युवकावर शालिग्राम करांडे, दादाराव हटकर आणि कैलास करांडे या तिघांनी हल्ला केला. शालिग्राम याने पूर्वी आपल्या शेतात नांगरणीसाठी अजयची मदत घेतली होती. मात्र, संबंधित कामाचे ५ हजार रुपये अजयला न दिल्यामुळे त्याने मोबदला मागितला होता. या मागणीवरूनच संतप्त होऊन आरोपींनी मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय गणेशपूर येथे पीक फवारणीसाठी औषधे घेण्यासाठी गेला असताना आरोपी शालिग्रामने त्याला पाहताच शिवीगाळ करत दगड आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने अन्य दोन साथीदारांना फोन करून बोलावले आणि तिघांनी मिळून अजयला जबरदस्त मारहाण केली. यावेळी त्यांनी जातीयवाचक शिवीगाळदेखील केली.

दरम्यान, अजयचा काका गणेश सोनटक्के याने वेळेवर पोहोचून त्याला तिघांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत अजयला खामगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने रक्तस्त्राव झाला असून त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे.

या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात संतप्त वातावरण असून, जिल्हा प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

ही घटना खामगाव शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दलित युवकाच्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घडल्याने जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुन्हा एकदा दलित अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!