अकोला न्यूज नेटवर्क
अकोला : पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. विद्यालयाच्या प्राचार्या कविता चव्हाण यांनी ही माहिती देत इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.
या प्रवेश परीक्षेमार्फत अकोला जिल्ह्यातून ८० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. परीक्षा दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी निश्चित करण्यात आला आहे. अर्ज प्रक्रिया केवळ ऑनलाइन स्वरूपात असून, उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागेल.
अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि अटी
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज https://cgseitms.rcil.gov.in/nvs/index/Registration या संकेतस्थळावर करावा. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती योग्य रीतीने भरावी.
विद्यार्थ्यांनी सलग ३री ते ५वी इयत्तेपर्यंत कोणत्याही सरकारी किंवा मान्यताप्राप्त शाळेत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किमान ४० टक्के अपंगत्वाचे अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. हे सर्व निकष पूर्ण करणारेच विद्यार्थी परीक्षा अर्जासाठी पात्र ठरणार आहेत.
महत्त्वाची माहिती व संपर्क
अर्ज, पात्रता व प्रवेश परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जवाहर नवोदय विद्यालय, बाभुळगाव जहा. येथे थेट भेट द्यावी किंवा 0724-2991087 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यालय प्रशासनाने कळवले आहे.
ही प्रवेश परीक्षा ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी मानली जात असून, शिक्षणाच्या गुणवत्तेचा उच्च स्तर असलेल्या नवोदय विद्यालयात निवड होणे अनेकांसाठी गौरवाची बाब ठरते. त्यामुळे या परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.