WhatsApp

स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी मोठी संधी, MPSC कडून २८२ पदांची भरती

Share

अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामार्फत २८२ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून, राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर ९ नोव्हेंबर २०२५ रोजी ही परीक्षा पार पडणार आहे.



यामध्ये राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) पदासाठी २७९ जागा आणि सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) पदासाठी ३ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. तसेच चालू चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

एमपीएससीने स्पष्ट केले आहे की ही पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्रता ठरवणारी आहे. मुख्य परीक्षेची तारीख आणि संबंधित सूचना आयोग स्वतंत्रपणे जाहीर करणार आहे.

आरक्षण व पदसंख्येत बदलाची शक्यता
गट ब अराजपत्रित सेवेमधील विविध संवर्गांमधील पदे शासनाच्या संबंधित विभागांच्या मागणीनुसार भरण्यात येणार आहेत. आयोगाने सूचित केले आहे की जाहिरातीच्या दिनांकानुसार प्राप्त पदांचा समावेश जाहिरातीत करण्यात आला आहे, मात्र पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम होईपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांनुसार पदांची संख्या व संवर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी हे बदल लक्षात घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे.

आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, निकाल जाहीर होईपर्यंत सरकारकडून येणाऱ्या सर्व अधिकृत मागण्या आणि बदल विचारात घेऊनच अंतिम भरती प्रक्रिया पार पडेल. यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अधीन असलेल्या जागांचाही समावेश असू शकतो.

त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असून, आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून जाहिरात तपासून वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!