अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : विधान परिषदेत पत्ते खेळणे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ताशेरे ओढले. मंत्रिपदावर गदा येण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत अजित पवारांनी कोकाटेंना ‘तूर्तास’ माफ केले असले, तरी पुढील चुकांबाबत स्पष्ट इशारा दिला आहे. राजीनाम्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
गेल्या काही दिवसांत कोकाटेंनी विधानमंडळात वादग्रस्त विधाने केली होती. त्यातच मोबाईलवर पत्ते खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर राजकीय टीकेचा भडिमार झाला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी त्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा होती.
मात्र, अजित पवारांनी त्यांना विधानभवनातील अँटीचेंबरमध्ये बोलावले आणि दहा मिनिटांचा सुसंवाद केला. “तुमच्या वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते आहे. मी आणि सुनील तटकरे यांनी वारंवार सांगूनही तुमचे बोलणे आणि वागणे बदलत नाही. हे सहन केले जाणार नाही. आज तुम्हाला राहू देतो, पण पुढील चुकीवर मंत्रीपद गमवावे लागेल,” असा दम त्यांनी दिल्याचे समजते.
दरम्यान, शनिवारी कोकाटे यांनी नंदुरबारच्या शनिमंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्यावर रोहित पवार यांनी त्यांना टोला लगावत म्हटले होते, “चुकांचं समर्थन शनिदेव करत नाहीत.” यानंतर आज त्यांचं मंत्रिपद टिकल्याने ‘कोकाटेंना शनिदेवच पावले’ अशी चर्चा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांची नोंद घेणे आवश्यक ठरेल. कृषी साहित्य खरेदीप्रकरणात त्यांना न्यायालयाकडून क्लीनचिट मिळाल्यानंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. मुंडेंच्या समर्थकांना आशा होती की कोकाटेंच्या जागी त्यांना मंत्रिपद दिले जाईल. परंतु, कोकाटेंना अजित पवारांकडून संधी दिली गेल्यामुळे मुंडे समर्थकांची निराशा झाली आहे.
शिवाय, कोकाटेंवरील पुढील कारवाई थांबवली असली तरी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर राहणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंत्रिपद कायम ठेवले असले तरी त्यांच्यासाठी राजकीय शिस्तीची कसोटी सुरु झाली आहे.
अशा परिस्थितीत, कोकाटेंनी यापुढे आपले वर्तन सुधारले नाही तर पक्षात टिकाव लागणे कठीण होईल. दुसरीकडे, धनंजय मुंडेंना दुसऱ्या प्रकरणात क्लीनचिट मिळाल्यास मंत्रिमंडळातील त्यांच्या पुनर्प्रवेशाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडी अधिक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.