WhatsApp

‘मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेचा खून केला!’ राहुल गांधींचा थेट आरोप

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर तीव्र शब्दांत टीका केली असून, “भारतीय अर्थव्यवस्था मृत आहे. मोदींनी अर्थव्यवस्थेचा खून केला आहे,” असा थेट आरोप त्यांनी X (माजी ट्विटर) वरून केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.



राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडल्याचा दावा करत पाच ठळक मुद्द्यांची मांडणी केली. त्यांनी यामागे अदानी-मोदी संबंध, नोटाबंदी, जीएसटी, MSME क्षेत्राचा ऱ्हास, आणि शेतकऱ्यांवरील अन्याय या बाबींचा उल्लेख केला.

त्यांच्या मते, मोदी सरकारने काही मोजक्या उद्योगसमूहांच्या फायद्यासाठीच धोरणं आखली असून सामान्य उद्योग, लघु व मध्यम उद्योजक आणि शेतकरी यांना वाऱ्यावर सोडले. त्यांनी विशेषतः अदानी समूहाचे उदाहरण देत म्हटले, की सरकारच्या निर्णयांचा थेट फायदा या कंपनीला मिळतो आहे.

राहुल गांधी यांनी 2016 मधील नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीवरही टीका करत सांगितले की, असंघटित क्षेत्र पूर्णपणे कोलमडले. “MSME क्षेत्र कोसळले असून, लघु उद्योजकांना चालवणे अशक्य झाले आहे,” असे ते म्हणाले.

‘मेक इन इंडिया’ प्रकल्पाचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, “हा प्रकल्प केवळ ‘अ‍ॅसेम्बल इन इंडिया’ ठरला आणि तोही यशस्वी झाला नाही.”

त्यांच्या म्हणण्यानुसार, मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशातील तरुण बेरोजगार झाले आहेत. “मोदींनी भारताच्या तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. कारण देशात नोकऱ्याच उरल्या नाहीत,” असे त्यांनी नमूद केले.

शेतकरी धोरणावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. कृषी कायदे, कर्जमाफीच्या अपयशी घोषणा आणि हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याचा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधींचे हे वक्तव्य आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात असून, त्यातून सरकारविरोधात काँग्रेसची निवडणूक मोहीम आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!