WhatsApp

‘बायकोला घेऊन जायचंय? आधी हप्ता भरा!’ खासगी बँकेचा धक्कादायक व्यवहार

Share

अकोला न्यूज नेटवर्क
झाशी (उत्तर प्रदेश): झाशी जिल्ह्यातील बामहरौली गावात एका खासगी ग्रुप लोन बँकेने हप्त्याच्या वादातून महिला कर्जदाराला बँकेत जबरदस्तीने तासन्‌तास बसवून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडला. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत महिलेची सुटका केली. पीडितेचा आरोप आहे की, तिने कर्जाचे ११ हप्ते भरले असूनही बँकेने फक्त ८ हप्ते दाखवले आणि उरलेले पैसे एजंटांनी हडप केल्याचा दावा केला.



ही घटना सोमवारी आझाद नगर येथील एका खासगी बँकेत घडली. पूंछ येथील रहिवासी रवींद्र वर्मा यांनी पोलिसांना कळवले की, त्यांची पत्नी पूजा वर्मा हिला बँकेतील कर्मचाऱ्यांनी सकाळी १२ वाजल्यापासून जबरदस्तीने तिथे बसवून ठेवलं होतं. बँक कर्मचाऱ्यांनी थेट सांगितले की, “कर्जाचे उरलेले पैसे भरल्याशिवाय पत्नीला घेऊन जाता येणार नाही.”

घटनेनंतर पोलिसांनी बँकेत धाव घेऊन महिलेची सुटका केली. पूजा वर्मा हिने सांगितले की, ४०,००० रुपयांच्या कर्जावर ती नियमितपणे हप्ते भरत होती. मात्र, बँकेचे एजंट कौशल आणि धर्मेंद्र यांनी ३ हप्ते घेतले तरी ते रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले नाहीत. त्यामुळे बँकेने उरलेली रक्कम देण्याचा दबाव टाकत तिच्यावर अन्याय केला.

कानपूर देहातचे बँक व्यवस्थापक अनुज कुमार यांनी मात्र वेगळा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पूजा वर्मा सात महिन्यांपासून हप्ता भरत नव्हती. त्यामुळे तिला बँकेत बोलावण्यात आले होते. मात्र, महिलेच्या जबाबांनुसार तिला जबरदस्तीने ४ तास ऑफिसमध्ये ठेवण्यात आले आणि नवऱ्याला पैसे भरण्याचा तगादा लावण्यात आला.

ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर ती प्रचंड व्हायरल झाली असून, खासगी कर्जसंस्थांच्या मनमानी कारभारावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पोलीस प्रशासनाने याप्रकरणी चौकशी सुरू केली असून, आवश्यक कारवाईचे संकेत दिले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!