अकोला न्यूज नेटवर्क
श्रीहरिकोटा : भारत आणि अमेरिकेने संयुक्तपणे विकसित केलेल्या ‘निसार’ (NASA-ISRO Synthetic Aperture Radar) या अत्याधुनिक उपग्रहाचे बुधवारी सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ‘जीएसएलव्ही एफ-१६’ या प्रक्षेपकाद्वारे सायंकाळी ५.४० वाजता झालेल्या उड्डाणानंतर केवळ १९ मिनिटांत ‘निसार’ने ७४५ किलोमीटर उंचीवरील अपेक्षित ध्रुवीय कक्षा गाठली.
या उपग्रहाच्या माध्यमातून भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, पूर, वादळ, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तींबाबत अचूक पूर्वसूचना मिळणार असून, विज्ञान, हवामानशास्त्र आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी ठरणार आहे.
‘निसार’ मोहिमेचा एकूण कालावधी ५ वर्षांचा असून, उपग्रह कार्यान्वित होण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. येत्या काही दिवसांत ‘एल’ आणि ‘एस’ बँड रडार यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यासाठी उपग्रहाचे स्थान आणि प्रणाली अचूकरीत्या स्थिरावण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या मोहिमेत ‘इस्रो’ने प्रक्षेपण प्रणाली, एस बँड रडार, डेटा हाताळणी व उपग्रह नियंत्रण विकसित केले असून, नासाने एल बँड रडार, जीपीएस रिसिव्हर व सॉलिड स्टेट रेकॉर्डरचा भाग विकसित केला आहे. प्रतिमा प्राप्त करण्यासाठी दोन्ही संस्थांचे सहकार्य असून, त्यानंतर त्या वैज्ञानिक अभ्यासासाठी वितरित केल्या जातील.
‘जीएसएलव्ही एफ-१६’ च्या माध्यमातून भारताच्या अंतराळ क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड ठरवणाऱ्या ‘निसार’ प्रक्षेपणाबद्दल इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी समाधान व्यक्त केले. “आपण अपेक्षित कक्षा अचूक गाठली आहे, आता पुढील कामकाजासाठी तयारी सुरू झाली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.