अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची १७ वर्षांनंतर विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे देशभरात चर्चेला उधाण आले असून, ‘जर हे आरोपी निरपराध होते, तर मग स्फोट कोणी घडवले?’ हा मूलभूत प्रश्न आता उभा राहिला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या असून, सरकारच्या चौकशी यंत्रणा आणि न्यायप्रक्रियेवरही संशय व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, “बॉम्बस्फोट झाला हे निश्चित आहे. मृत्यू झाले, शहीदही झाले. मग आरोपी कुठे आहेत? हे सरकार आणि तपास यंत्रणांचे अपयश नाही का?” त्यांनी शहीद एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याही तपासाचा संदर्भ देत म्हटले की, “करकरे यांनी याचे धागेदोरे उलगडले होते. पण पुढे काहीच झाले नाही. आता ही जबाबदारी सरकारची आहे.”
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या निकालावर तीव्र प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, “या प्रकरणातून भाजपने राजकीय फायदा घेतला. साध्वी प्रज्ञा सिंह यांना निर्दोष ठरवले गेले आणि त्यांना खासदार बनवण्यात आले. मग ‘हिंदू दहशतवाद’ अशी संज्ञा वापरण्याचे कारण काय? लष्करातील अधिकाऱ्यांवर खोटे आरोप लावून देशाची सुरक्षा यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात आणली गेली.”
या खटल्यात सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश होता. न्यायालयाने पुराव्याअभावी सर्वांना निर्दोष मुक्त केले आहे. मात्र, यामुळे आता खऱ्या गुन्हेगारांचा शोध कोण घेणार? हे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.
या खटल्याच्या पार्श्वभूमीवर आता न्यायव्यवस्था, तपास संस्था आणि राजकीय हेतूंवर नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकार पुढे काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.