WhatsApp

श्री गजानन महाराजांची पालखी शेगावमध्ये भाविकांच्या उत्साहात दाखल; भक्तिभाव, सेवाभाव अन् अध्यात्माने उजळली संत नगरी

Share

अकोला न्यूज नेटवर्क
शेगाव : “साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा” या संतवचनांचा अनुभव देणारा क्षण आज शेगाववासीयांनी अनुभवला. श्री संत गजानन महाराजांची पवित्र पालखी पंढरपूरहून परत येत शेगाव नगरीत मोठ्या भक्तिभावात दाखल झाली. आषाढी एकादशीनिमित्त गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही या पालखी यात्रेने शेगाव ते पंढरपूर असा सुमारे ६५० किमीचा शिस्तबद्ध प्रवास पूर्ण केला. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी भक्तिभावाने माथा टेकल्यानंतर पुन्हा संतनगरीत आगमन झाल्यावर भाविकांनी टाळ, मृदुंग, अभंग आणि जयघोषात महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं.



खामगाव ते शेगाव या अंतिम टप्प्याच्या पायीवारीत हजारो भाविक सहभागी झाले होते. “गणगण गणात बोते…” च्या गजरात उत्साहाने आणि श्रद्धेने भरलेली ही दिंडी शेगावच्या दिशेने चालली होती. मार्गभर भाविकांसाठी पाणी, चहा, फराळ, विश्रांती, आरोग्य तपासणी आदींची सेवा ठिकठिकाणी भाविकांनीच केली. यामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी आपला सहभाग नोंदवला.

विशेषतः चिखली येथील माजी नगराध्यक्ष रामदासभाऊ देव्हडे व त्यांच्या कुटुंबीयांनी सलग सातव्या वर्षी नवोदय विद्यालयाजवळ वारकऱ्यांची सेवा करत एक आगळी परंपरा जपली. थकलेल्या वारकऱ्यांचे पाय गरम पाण्याने धुऊन त्यांना आरामदायक उपचार दिले गेले. या सेवेमुळे भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

सायंकाळी पालखी शेगाव मंदिर परिसरात पोहोचली तेव्हा परिसर आध्यात्मिकतेने भारून गेला होता. मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच पुष्पवृष्टी, मंगलवाद्यांचा गजर आणि उंचावलेल्या जयघोषात पालखीचे स्वागत झाले. अभंग व भजनांचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत रंगला. श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण शेगाव सजून निघाले होते. शहरातील रस्ते, चौक, इमारती भगव्या पताका, फुलांची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते.

Watch Ad

पालखी दर्शनासाठी अपंग, वृद्ध, महिला, लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘संत गजानन महाराज की जय’च्या घोषात मंदिर परिसर भारावून गेला होता. काही भक्तांनी पायाने चटई ओढत मंदिरात येत पालखीसमोर माथा टेकला. ही भक्ती आणि श्रद्धेची ऊर्जा साऱ्यांना भारावून टाकणारी होती.

यात्रेनंतर मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी महाप्रसाद, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार सुविधा, निवास व वाहतुकीची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पालखी परतल्यावर तीन दिवस विशेष पूजन, आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी संपूर्ण शेगाव शहर सज्ज झाले आहे.

या संपूर्ण पालखी यात्रेला राजकीय, सांप्रदायिक व सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग लाभला. संत परंपरेच्या जपणुकीसाठी केलेल्या या यात्रेचा उद्देश अध्यात्म, संयम, सेवा व समाजजागृती हा होता, ज्याचे दर्शन या यात्रेत प्रकर्षाने घडले.

गेल्या अनेक दशकांपासून संत गजानन महाराज पालखी यात्रा फक्त शेगाव व पंढरपूरपुरती मर्यादित नसून, देशभरातील भाविकांची श्रद्धास्थळी बनली आहे. पंढरपूरच्या वारीप्रमाणेच या यात्रेलाही संत परंपरेचा वारसा जपणाऱ्या हजारो भाविकांची उपस्थिती लाभते. महाराजांच्या कृपेने ही यात्रा यशस्वीपणे पार पडली, अशी भावना शेगाववासीयांनी व्यक्त केली.

Leave a Comment

error: Content is protected !!