अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राजकीय क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. २००८ मध्ये घडलेल्या या स्फोटांनंतर सुरु झालेल्या तपासातून भाजप नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींवर खटला चालवण्यात आला होता. अखेर आज अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या खटल्यावर न्यायालयाचा निकाल लागला.
या निकालावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा! हिंदुत्वाला दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न या प्रकरणात झाला होता. पण आज न्यायालयाने त्या आरोपांवर शिक्कामोर्तब नाकारून सत्याला उजाळा दिला आहे.”
त्यांनी स्पष्ट केलं की, “तेव्हा यूपीएचं सरकार होतं. मोठ्या प्रमाणात देशात बॉम्बस्फोट सुरू होते आणि दहशतवादाला रंग देण्याचा प्रयत्न केला गेला. मालेगाव स्फोटाच्या निमित्ताने हिंदुत्वाला ‘भगवा दहशतवाद’ या टर्मने जोडण्यात आलं. मात्र आजचा निकाल या राजकीय प्रचाराला सणसणीत प्रत्युत्तर आहे.”
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली असून, “दहशतवाद कुठलाही असो, आम्ही त्याचा विरोध करतो. मात्र न्यायप्रक्रियेत दूध का दूध, पानी का पानी होणं गरजेचं होतं. उशीर झाला असला तरी न्याय मिळाला, हे स्वागतार्ह आहे,” असं ते म्हणाले.
या निकालाचा देशभरात राजकीय पडसाद उमटले असून, भाजपने यास “न्यायाचं विजय” म्हटलं आहे, तर काही विरोधी नेत्यांनी तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणातून निष्पन्न झालेल्या व्यक्तींनी दीर्घकाळ कारागृहात, चौकशीत आणि समाजाच्या कोंडमाऱ्यात दिवस घालवले. आता त्यांना मिळालेला न्याय म्हणजे त्यांच्यावरील कलंक धुवून टाकणारा निर्णय असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय चर्चा अधिक तीव्र झाली असून, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याशी संबंधित रेव्ह पार्टी प्रकरण, तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य भेटीबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात एकाच दिवशी अनेक ठळक घडामोडी घडल्याचे चित्र पाहायला मिळाले.