अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील शासकीय आणि टॉप अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या सुमारे १० हजार जागांसाठी यंदाही प्रचंड स्पर्धा पाहायला मिळणार आहे. नीट यूजी २०२५ परीक्षेनंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सुरू केलेल्या नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बुधवारी सायंकाळपर्यंत तब्बल ५९ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
एमबीबीएस, बीडीएससह बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटी, बीओटी, बीएएसएलपी, बीएनवायएस यांसारख्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुवार (१ ऑगस्ट) हा कागदपत्रे अपलोड आणि शुल्क भरण्याचा अंतिम दिवस आहे. या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम यादी २ ऑगस्टला तर पहिली निवड यादी ७ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
गेल्यावर्षीचा अनुभव – कटऑफने वाढवली चिंता
गेल्यावर्षी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा कटऑफ थेट ६५० ते ६९० दरम्यान पोहोचला होता. मुंबईतील केईएम रुग्णालयात शेवटच्या विद्यार्थ्याचा स्कोअर तब्बल ६९० तर टॉप विद्यार्थ्याचा ७०५ होता. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजचा शेवटचा कटऑफ ६८५ तर ग्रँट मेडिकल कॉलेजचा ६७५ होता. सायन मेडिकलचा कटऑफही ६७५ वर स्थिरावला होता.
नागपूर, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, मिरज, सातारा, बारामती यांसारख्या ठिकाणीही ६४० गुणांपेक्षा कमी स्कोअरला संधी मिळालेली नव्हती. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कटऑफ ६७०, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचा ६४१ होता.
बीडीएस अभ्यासक्रमातही चुरस तीव्र
दंतशास्त्र अभ्यासक्रमासाठी देखील स्पर्धा कमी नव्हती. मुंबईच्या शासकीय दंत महाविद्यालयाचा कटऑफ ५८९, नायरचा ५८७, नागपूरचा ५८७ आणि संभाजीनगरचा ५८१ होता. विशेष म्हणजे रत्नागिरी, अकोला, सिंधुदुर्ग, नंदुरबार, अलिबाग, गोंदिया यांसारख्या नव्याने स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयांतही ६४० च्या आसपासचा कटऑफ राहिला होता.
शासकीय जागा कमी, खासगी शुल्क महाग
राज्यात सुमारे २८ हजार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा असल्या तरी एमबीबीएस आणि बीडीएसच्या गुणवत्तापूर्ण शासकीय महाविद्यालयांतील जागा फक्त सुमारे १० हजारच आहेत. त्यामुळे ६५० पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांचा पर्याय घ्यावा लागतो. मात्र तिथले फी स्ट्रक्चर हे बहुतांश पालकांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांनाही संधी गमवावी लागते.
स्पर्धा अजून तीव्र होण्याची शक्यता
अर्ज दाखल केलेल्या ५९ हजार विद्यार्थ्यांपैकी बहुतांश नीट पात्रतेसह ६५० ते ७०० गुणांदरम्यान आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे यंदाही टॉप महाविद्यालयांसाठीचा कटऑफ ६७० च्या वर जाण्याची शक्यता आहे. निवड यादी जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये समाधान आणि निराशा दोन्ही भावना दिसून येणार आहेत.