WhatsApp

१२७ वर्षांनंतर गौतम बुद्धांचे पवित्र अवशेष भारतात परतले; ऐतिहासिक क्षणाची नोंद

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : भगवान तथागत गौतम बुद्धांचे पिप्राहवा तथा प्राचीन कपिलवास्तू परिसरातून सापडलेले पवित्र अवशेष तब्बल १२७ वर्षांनी भारतभूमीत परतले आहेत. ब्रिटीश काळात थायलंडला पाठवले गेलेले हे अवशेष मे २०२४ मध्ये एका आंतरराष्ट्रीय लिलावात विकले जाण्याच्या तयारीत होते. मात्र भारत सरकारच्या त्वरित हस्तक्षेपामुळे लिलाव थांबवण्यात आला आणि थायलंड सरकारच्या सहकार्याने अखेर हे अवशेष भारताच्या ताब्यात आले आहेत.



हे अवशेष १८९८ साली उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील पिप्राहवा येथील प्राचीन बौद्ध स्तूपाच्या उत्खननात सापडले होते. त्या काळात प्राप्त झालेले अवशेष म्हणजे भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचे अंश, क्रिस्टलचा कलश, सोपस्टोनमध्ये कोरलेली पेटी, वाळूच्या खडकांपासून बनवलेली नाजूक डबी, काही मौल्यवान रत्ने आणि सुवर्ण अलंकार यांचा समावेश होता. या अवशेषांपैकी काही भाग १९०० च्या दशकात थायलंडच्या तत्कालीन राजा सीयामला भेटस्वरूप देण्यात आला होता.

इतिहास व वारसाची साखळी परत एकत्र
बौद्ध परंपरेनुसार, भगवान बुद्धांचे अस्थिकलश म्हणजे अत्यंत पूजनीय धार्मिक अवशेष मानले जातात. पिप्राहवा परिसरात सापडलेले अवशेष कलशात सुसज्जरित्या जतन केलेले होते. याच परिसरातील एक कलश कोलकात्याच्या संग्रहालयातही ठेवण्यात आला आहे. त्यावर ब्राह्मी लिपीत “या कलशात भगवान बुद्धांचे अवशेष असून, ते सुकीर्ती बंधूंनी शाक्य पंथाला अर्पण केले आहेत,” असा उल्लेख आहे. त्यामुळे काही अभ्यासकांच्या मते हे अवशेष सुकीर्ती बंधू — म्हणजेच बुद्धांचे नातलग — यांच्या अस्थींचे संकलन असण्याची शक्यता आहे.

लिलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार
मे २०२४ मध्ये लंडनमधील सुप्रसिद्ध लिलाव संस्था ‘सुदबी’कडून या अवशेषांचा लिलाव होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालत थायलंड सरकारशी समन्वय साधला. ऐतिहासिक वारसाचा अपमान रोखण्यासाठी सुरू झालेली ही मोहीम यशस्वी ठरली आणि आता हे पवित्र अवशेष भारतात परतले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी या ऐतिहासिक क्षणाची माहिती एक्स या सामाजिक माध्यमावरून शेअर करत, “भारताच्या ऐतिहासिक वारसा हक्काच्या दृष्टीने हा दिवस गौरवाचा आहे. भगवान बुद्धांचे पवित्र पिप्राहवा अवशेष १२७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या घरी परतले आहेत,” असे म्हटले आहे.

जागतिक स्तरावर बौद्ध अनुयायांमध्ये आनंदाची लाट
गौतम बुद्धांचे हे पवित्र अवशेष भारतात परतल्यामुळे जगभरातील बौद्ध अनुयायांमध्ये समाधान आणि उत्साह आहे. केंद्र सरकारने या अवशेषांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्याची तयारी सुरू केली असून, भविष्यात ते राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्याचा प्रस्तावही चर्चेत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!