अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यभरातील कृषी अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, २२ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज शुल्कासह अंतिम केले आहेत. कृषी विद्यापीठांअंतर्गत नऊ पदवी अभ्यासक्रमांसाठी २७ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. आता ३१ जुलै रोजी या प्रवेश प्रक्रियेची अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
बी.एस्सी अॅग्रिकल्चर, बी.एस्सी हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरी, फूड टेक्नोलॉजी, बायोटेक्नोलॉजी, कृषी अभियांत्रिकी, अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट आणि कम्युनिटी सायन्स या शाखांमध्ये एकूण १९८ महाविद्यालयांतील १७ हजार ७९६ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यात ४७ शासकीय महाविद्यालयांमध्ये ३,६२६ जागा असून, १५१ विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये १४,१७० जागा आहेत.
या प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण २७ हजार ५७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २२ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अंतिम अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी करूनही अर्ज अंतिम केला नाही.
दरम्यान, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी बारावीला ५० टक्के गुणांची किमान पात्रता अट ४५ टक्क्यांपर्यंत शिथिल केली आहे. याचा फायदा यंदा फक्त ५३ विद्यार्थ्यांना झाला असून, हा निर्णय उशिरा लागू झाल्यामुळे त्याचा व्यापक लाभ मिळू शकला नाही. मात्र पुढील वर्षी अधिक विद्यार्थी या सवलतीचा लाभ घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
प्रवेश प्रक्रियेची अंतिम गुणवत्ता यादी ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर कॉलेज निवडीच्या टप्प्यावर प्रवेश निश्चिती होईल. विद्यार्थ्यांनी अर्जातील तपशील, गुण व कागदपत्रांची पूर्तता वेळेत तपासावी, असे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.