अकोला न्यूज नेटवर्क
अकोला | राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीजपुरवठा करण्याच्या दिशेने मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना २.० प्रभावीपणे पुढे सरकत असून, अकोला जिल्ह्यात या योजनेंतर्गत ६३ प्रकल्पांद्वारे एकूण २०५ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. येत्या तिमाहीत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकसंवाद व गतीमान प्रशासन यावर भर द्यावा, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिले आहेत.
या योजनेंतर्गत जिल्ह्यात सध्या १२ प्रकल्प कार्यान्वित असून, त्यातून ५५ मेगावॅट वीजनिर्मिती होते आणि १९ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळतो. उर्वरित प्रकल्प लवकरच मार्गी लागतील, असे आश्वासन बैठकीत देण्यात आले. जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि महावितरणचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
लोकेश चंद्र यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू झाली असून, संपूर्ण देशासाठी ती आदर्श ठरली आहे. विकेंद्रीत सौर प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यभरात एकूण १६ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा उद्देश आहे. अकोल्यात यासाठी ६३ उपकेंद्राच्या क्षेत्रात सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात सध्या सौर प्रकल्पांसाठी १२ ठिकाणी काम पूर्ण झाले असून, शासकीय आणि खाजगी जमिनीचे भूसंपादन वेगाने सुरू आहे. ८५० शासकीय इमारतींवर सौर उर्जेचे सोलरायझेशन सुरु आहे. तसेच २८ गावांना सौरग्राम बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्वातंत्र्यदिनी ग्रामसभांमधून या योजनेविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाने सांगितले की, अकोला जिल्हा प्रकल्पासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात राज्यात आघाडीवर आहे. भविष्यातील शेतीला वीजपुरवठा स्थिर आणि स्वच्छ पद्धतीने व्हावा या उद्देशाने सौर प्रकल्पांची उभारणी ही एक निर्णायक पाऊल ठरणार आहे.