अकोला न्यूज नेटवर्क
अकोला | अकोला जिल्ह्यातील लिंगनिदान प्रतिबंध कार्यात अधिक सुधारणा करण्यासाठी “ट्रॅकिंग सिस्टीम” प्रभावीपणे राबवली जावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. त्यांनी सोनोग्राफी सेंटरवर अचानक धाडी आणि तपासण्या वाढवण्याचे आदेश दिले असून आशा सेविकांनी गरोदर महिलांचा डेटा व तपासणी माहिती काटेकोरपणे राखावी, असेही स्पष्ट केले.
सीआरएस अहवालानुसार अकोल्याचे लिंग गुणोत्तर आता १००० पुरुषांमागे ९४० महिलांपर्यंत सुधारले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध आरोग्य विभागांच्या बैठका पार पडल्या. पीसीपीएनडीटी टास्क फोर्स, एड्स नियंत्रण, तंबाखू प्रतिबंध, राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अशा बैठकींत जिल्हा स्तरावर आरोग्यविषयक धोरणांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, ॲड. शुभांगी ठाकरे यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य उपस्थित होते.
तंबाखूविरोधातही जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. शाळा परिसर पूर्णतः तंबाखूमुक्त करण्यासाठी मोहिम राबवावी, शाळा-शाळांचे सर्वेक्षण करावे, जागृतीसाठी मेळावे घ्यावेत आणि पोलीस यंत्रणांच्या मदतीने आवश्यक कारवाई करावी, असे सांगण्यात आले. सर्व तालुक्यांत तंबाखू प्रतिबंध समित्या स्थापन करण्याचाही आदेश देण्यात आला.
राष्ट्रीय मौखिक आरोग्य मोहिमेअंतर्गत २६५ तपासण्या घेण्यात आल्या असून त्यात २२ जणांना कर्करोगपूर्व स्थितीचे निदान झाले आहे. त्यांना आवश्यक उपचार आणि मार्गदर्शन देण्यात आले. दरम्यान, एड्स नियंत्रण कार्यक्रमात २०२४-२५ दरम्यान ९५,३५२ तपासण्या झाल्या असून त्यात २१८ एचआयव्ही बाधित रुग्ण आढळले आहेत. जोखमीच्या क्षेत्रात अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यावर भर दिला जाणार आहे.