WhatsApp

“लेट्स ब्रेक इट डाउन” — हिपॅटायटिस दिनानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम

Share

अकोला न्यूज नेटवर्क
अकोला | जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “Let’s Break It Down” या २०२५ सालच्या थीमनुसार यकृतविकार आणि विशेषतः हिपॅटायटिससारख्या संसर्गजन्य आजारांविषयी सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांवर मात करून सर्वांसाठी उपचारसुलभता वाढवण्याचा निर्धार या कार्यक्रमात करण्यात आला.



कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार, वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. अस्लम, डॉ. उमेश अग्रवाल, डॉ. वाडेकर आणि डॉ. अबिद यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी हिपॅटायटिसचे विविध प्रकार, कारणे, लसीकरणाचे महत्त्व आणि उपचाराबाबत उपस्थितांना माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. मेघना बगडिया यांनी केले. त्यांनी उपस्थितांमध्ये यकृताच्या कर्करोगाशी संबंधित वाढत्या प्रमाणाविषयी जागरूकता निर्माण करत “हिपॅटायटिस निर्मूलन ही केवळ वैद्यकीय जबाबदारी नसून सामाजिक सहभागातूनच ती शक्य आहे,” असे स्पष्ट केले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी स्त्री रुग्णालयातील एमसीएच टीम आणि नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी उपस्थितांना लसीकरणाविषयी माहितीपत्रके वाटली आणि जनजागृतीपर घोषणाही दिल्या.

डॉ. वंदना पटोकार यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “हिपॅटायटिस ही ‘साइलेंट किलर’ म्हणून ओळखली जाते. अनेक वेळा लक्षणे उशिरा समोर येतात. त्यामुळे नियमित तपासणी, लसीकरण आणि आरोग्यविषयक साक्षरता अत्यावश्यक आहे.”

या कार्यक्रमाद्वारे हिपॅटायटिसविषयी समाजात अधिक सखोल माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने अशा कार्यक्रमांतून सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य विषयक महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवले जात आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!