WhatsApp

गुजरात ATSचे धाडसी ऑपरेशन: पाकिस्तानशी थेट संपर्कात असलेली शमा परवीन अटकेत

Share

अकोला न्यूज नेटवर्क
अहमदाबाद : अल कायदाशी संबंधित दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करत गुजरात ATS ने बेंगळुरूमधून शमा परवीन या ३० वर्षीय महिला दहशतवाद्याला अटक केली आहे. ती AQIS (Al-Qaeda in Indian Subcontinent) या संघटनेच्या महिला शाखेची मुख्य संयोजक होती. ही कारवाई देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.



शमा परवीन ही मूळची झारखंडची असून सध्या ती बंगळुरूमध्ये वास्तव्यास होती. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादी विचारसरणीचा प्रचार करत होती आणि कट्टरपंथी युवांना भारती करून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिचे पाकिस्तानमधील काही संपर्क उघड झाल्यानंतर गुजरात ATS सतत तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती.

राज्याचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी ही माहिती देताना सांगितले की, गुजरात पोलिसांनी याआधी अटक केलेल्या चार दहशतवाद्यांच्या चौकशीतून शमा परवीनचा तपशील समोर आला. तिचा थेट पाकिस्तानमधील काही लोकांशी संपर्क होता. या पाच जणांनी मिळून एक स्वतंत्र दहशतवादी मॉड्यूल स्थापन केले होते, जे आधीच्या कोणत्याही नेटवर्कपेक्षा वेगळे होते.

या मॉड्यूलमधील अटक केलेल्या इतर चार संशयितांमध्ये दिल्लीचे मोहम्मद फैक मोहम्मद रिजवान, अहमदाबादचे मोहम्मद फरदीन, मोडासाचे सैफुल्लाह कुरेशी आणि नोएडाचे झीशान यांचा समावेश आहे. हे सर्व मध्यमवर्गीय कुटुंबांतील असून रेस्टॉरंट्स, दुकाने, फर्निचर व्यवसाय अशा ठिकाणी काम करत होते.

या नेटवर्कचा उद्देश देशात शरिया कायदा लागू करणे, लोकशाही व्यवस्थेचा अंत करणे आणि तरुणांना धार्मिक अतिरेकी विचारांकडे वळवणे हा होता. सोशल मीडियावरून त्यांनी कट्टर विचारांचे व्हिडीओ, पोस्ट्स शेअर करत तरुणांमध्ये जिहादी मानसिकता रुजवण्याचा प्रयत्न केला. ‘जिहादसाठी बॉम्ब लागतोच असं नाही, चाकूसुद्धा पुरेसा आहे’ असे भडकाऊ संदेश पोस्ट करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, शमा परवीन ही त्या नेटवर्कची ‘डिजिटल ब्रेन’ होती. ती इंस्टाग्राम, टेलीग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरून जिहादी प्रचार करत होती. तिच्या अटकेनंतर तिच्याकडून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

गुजरात ATS ने या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास अधिक गतीने सुरू केला आहे. देशविरोधी कारवायांना रोखण्यासाठी अशा कट्टरपंथीय नेटवर्क्सवर कारवाई करण्याची गरज अधिक तीव्र होत आहे, असे सुरक्षा विश्लेषक सांगत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!