WhatsApp

नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित होता, पोलिस यंत्रणा अपयशी

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नागपूर |नागपूर शहरात १७ मार्च रोजी झालेल्या दंगलीमागे गंभीर पूर्वनियोजन होते, असा दावा भारतीय विचार मंच व नागरिक सत्यशोधन समितीने आपल्या अहवालात केला आहे. यामध्ये पोलिस यंत्रणेच्या निष्क्रियतेवरही थेट सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, दंगलीचा उद्देश कायद्याचे राज्य उध्वस्त करणे व हिंदू समाजावर लक्ष केंद्रीत करणे होता, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



सत्यशोधन समितीनुसार, कबरीच्या प्रतिकृतीची विटंबना आणि हिरव्या कापडाची जाळपोळ या घटना केवळ निमित्तमात्र होत्या. मागील काही महिन्यांतील घटनांमुळे मुस्लिम समाजात पसरवले गेलेले गैरसमज या हिंसाचाराच्या मुळाशी होते. काही विशिष्ट मशिदींमध्ये त्यादिवशी नेहमीपेक्षा अधिक तरुण व अल्पवयीन मुले जमल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हिंसाचारग्रस्त भागातील अनेक घरांमध्ये महिलाच उपस्थित होत्या. जमावाने या घरांवर दगडफेक करत आत घुसण्याचा प्रयत्न केला. इस्लामच्या नावाने घोषणा देत महिलांमध्ये दहशत निर्माण करण्याचा कट रचण्यात आला होता, असेही या अहवालात नमूद आहे.

हिंसा होणार हे ठाऊक असूनही पोलिसांनी वेळीच पावले उचलली नाहीत. पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी मदतीसाठी अनेक वेळा संपर्क साधला, मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे पीडितांनी सांगितले. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अनुपस्थिती, पोलीसांकडे सुरक्षेसाठी आवश्यक शिल्ड व हेल्मेटचा अभाव, हे घटनेच्या तयारीत पोलिसांची कमी पडली याचे स्पष्ट निदर्शक आहेत.

हिंसाचाराच्या दिवशी नेहमी दुकानांबाहेर ठेवले जाणारे साहित्य दुपारपर्यंत हटवण्यात आले होते. यावरून दंगलीसाठी आधीच नियोजन करण्यात आले होते, असे समितीने स्पष्ट केले आहे. या घटनेत ३५ ते ४० पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, मुख्य आरोपी फिहम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!