अकोला न्यूज नेटवर्क
अकोला |अकोला जिल्ह्यातील कुरणखेड गावचा सुपुत्र व भारतीय लष्करातील जवान नितेश मधुकर घाटे यांना अयोध्यामध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. विजेचा जोरदार शॉक लागल्यामुळे २८ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या बातमीने गावात शोककळा पसरली असून, शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
नितेश घाटे हे गेल्या पंधरा वर्षांपासून भारतीय लष्करातील मराठा बटालियनमध्ये सेवा देत होते. अलीकडच्या काही दिवसांपासून ते अयोध्या येथे तैनात होते. कर्तव्य बजावत असतानाच त्यांना अचानक विजेचा शॉक लागल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची नेमकी कारणमीमांसा अद्याप समोर आलेली नाही.
कुरणखेडमधील मधुकर घाटे हे शेती करून कुटुंब चालवतात. त्यांचे तीन मुलगे होते. मोठा मुलगा संदीप घाटे यानेही भारतीय लष्करात सेवा बजावली होती, मात्र सेवानिवृत्तीनंतर एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. आता लहान मुलगा नितेश घाटे यांचाही अशाच अपघाती घटनेत अंत झाला आहे. एका कुटुंबाने दोन वीरपुत्र गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नितेश घाटे यांचे पार्थिव ३१ जुलै रोजी कुरणखेडमध्ये आणले जाणार असून, त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गावातील नागरिक, नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संपूर्ण गावात शोकमय वातावरण पसरले असून, शेतकऱ्याच्या घरातील हे वीरपुत्र देशसेवेसाठी शहीद झाल्याची भावना जनमानसात आहे.