अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची संधी समोर आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या ई-पिंक रिक्षा योजनेमध्ये मोठा बदल करत महिलांना स्वत:कडून एक रुपयाही न भरता रिक्षा मिळण्याचा मार्ग खुला करण्यात आला आहे. आता या योजनेत महिलांना द्यावा लागणारा १० टक्के हिस्सा देखील माफ करण्यात आला आहे. मात्र, इच्छुक महिलांना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करावा लागणार आहे.
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना सुरक्षित, स्वच्छ आणि स्वावलंबी रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे. पिंक ई-रिक्षा केवळ महिलांसाठी असून, त्या स्वतः चालवू शकतील. यामुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे, महिला प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवासाचा पर्याय निर्माण करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी करणे असे या योजनेचे बहुउद्देशीय स्वरूप आहे.
ई-पिंक रिक्षाची एकूण किंमत सुमारे ३.७३ लाख रुपये आहे. यापैकी २० टक्के रक्कम म्हणजे सुमारे ७५,००० रुपये शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपात दिली जाते. उर्वरित ७० टक्के म्हणजे सुमारे २.६२ लाख रुपये बँक कर्जाच्या माध्यमातून दिले जाते. पूर्वी महिलांना उर्वरित १० टक्के हिस्सा स्वत:कडून भरावा लागत होता. मात्र अर्ज केलेल्या महिलांपैकी अनेकजणी कर्जासाठी पात्र ठरत नव्हत्या, काही जणींना प्रशिक्षणासाठी पुढाकार नव्हता. त्यामुळे ही रक्कम आता माफ करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ६९० महिलांनी योजनेसाठी अर्ज केला आहे. मात्र यापैकी अनेक महिलांचा सिबिल स्कोअर खराब असल्यामुळे बँक कर्ज नाकारत आहे. दुसरीकडे काही महिला प्रशिक्षण घेण्यास इच्छुक नसल्याचेही समोर आले आहे. यामुळे लाभार्थींना प्रोत्साहित करण्यासाठी आणि योजनेंतर्गत वाहन वितरण सुनिश्चित करण्यासाठी शासनाने टोकाचा निर्णय घेत १० टक्के हिस्सा माफ केला आहे.
तरीही, रिक्षा चालवण्यासाठी प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. पात्र महिलांनी प्रशिक्षण घेऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यामुळे इच्छुक महिलांनी आपला अर्ज १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.