अकोला न्यूज नेटवर्क
ठाणे : झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. “मराठी लोगो को हम पटक पटक के मारेंगे” असे त्यांच्या तोंडून निघाल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वक्तव्याचा तीव्र निषेध करत ठाण्यात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात दुबेंना “मुंबई ये, समुंदर में डुबो डुबो के मारेंगे” असा थेट इशारा दिला.
याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील नितीन कंपनी चौकात मनसे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा व्यंगचित्र फलक उभारण्यात आला. या फलकात खासदार दुबेंना समुद्रात डुबवताना दाखवण्यात आले असून, फलकावर “हिंदी सक्तीचा माज असाच ठेचला जाईल” असे ठळकपणे लिहिण्यात आले आहे. यामुळे ठाण्यात हा फलक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
मनसेचे म्हणणे आहे की, मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात सहन केले जाणार नाही. महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीत अग्रगण्य असून, येथे येणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकावी व तिचा आदर करावा, ही भूमिका राज ठाकरे यांनी अनेकदा मांडली आहे. दुबे यांच्या विधानामुळे महाराष्ट्रातील भाषिक अस्मिता पुन्हा एकदा जागृत झाली आहे.
याआधीही केंद्र सरकारने पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यावर, मनसेच्या दबावामुळे शासनाने तो निर्णय मागे घेतला होता. यामुळे मनसेने आपल्या मराठीप्रेमाची भूमिका कायम ठेवल्याचे जनतेच्या निदर्शनास आले आहे. नागरिकांमध्येही दुबे यांच्या विधानाविरोधात रोष असून, सोशल मीडियावरही ‘#IAmMarathi’ सारखे ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत.
राजकीय व सामाजिक स्तरावर या प्रकरणाचा मोठा प्रभाव जाणवत असून, खासदार दुबेंनी आपले विधान मागे घ्यावे व महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे. अन्यथा मनसेने आंदोलनाची तयारी ठेवली आहे, असा इशारा देखील दिला आहे.