अकोला न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईत गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कोपरखैरणे भागात राहणाऱ्या एका 35 वर्षीय शिक्षिकेने आपल्या शाळेतील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्याने संपूर्ण संभाषणाची स्क्रीन रेकॉर्डिंग केली आणि तीच व्हिडिओ क्लिप त्याच्या आईच्या हाती लागल्याने हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेची विद्यार्थ्याशी ओळख वाढली होती. याच ओळखीच्या आधारावर तिने गुरुवारी रात्री 9 वाजता विद्यार्थ्याला इन्स्टाग्रामवरून व्हिडिओ कॉल केला. कॉलदरम्यान शिक्षिका अर्धनग्न झाली आणि तिने विद्यार्थ्यालाही कपडे काढण्यास भाग पाडले. हा संपूर्ण प्रकार स्क्रीन रेकॉर्ड झाला आणि मुलाच्या आईने पाहिल्यानंतर तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.
कोपरखैरणे पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिक्षिकेला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर तिला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेमुळे नवी मुंबई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. समाजमाध्यमांवर यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिस तपास अधिक गडद होत असून, शिक्षिकेचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील तिच्या इतर चॅट्स, कॉल लॉग्स, फोटो आणि व्हिडिओंचीही तपासणी करण्यात येत आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिक्षिकेने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का याचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांच्या शाळेतील सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोपरखैरणे पोलिसांनी सर्व पालकांना जागरूक राहण्याचे आवाहन करत कोणत्याही संशयास्पद वर्तनाची त्वरित माहिती द्यावी, असे सांगितले आहे.