अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : कारगिल युद्धात योगदान दिलेल्या निवृत्त नाईक हवालदार हकिमुद्दीन शेख यांच्या कुटुंबावर नागरिकत्वाची शंका घेत त्यांच्या घरी धाड टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पुण्याच्या चंदननगर भागात राहत असलेल्या शेख कुटुंबास काही पोलिस आणि गृहखात्याचे अधिकारी शनिवार २७ जुलै रोजी भेटले आणि त्यांच्याकडून नागरिकत्व सिद्ध करणारी कागदपत्रं मागितली.
या घटनेने राजकीय खळबळ उडाली असून, सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भातील संताप व्यक्त करत सरकारवर थेट टीका केली आहे. त्यांनी म्हटले, “कारगिल युद्धात लढलेल्या सैनिकाच्या कुटुंबाला जर नागरिकत्व सिद्ध करावं लागत असेल, तर ही संपूर्ण सैन्यशिस्त आणि त्याग यांचाच अवमान आहे.”
काय घडलं नेमकं?
हकिमुद्दीन शेख यांनी १९८४ ते २००० या कालखंडात भारतीय लष्कराच्या २६९ इंजिनीअर रेजिमेंटमध्ये सेवा बजावली. कारगिल युद्धात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, चंदननगर परिसरात अचानक ३०-४० जण पोलिसांसह त्यांच्या घरी आले. त्यांनी सर्व घरातील लोकांना घेरले आणि कागदपत्रांची मागणी केली.
शेख कुटुंबाने सांगितले की, पोलिसांनी रात्री त्यांना पोलीस ठाण्यात नेले आणि पहाटे ३ वाजेपर्यंत थांबवले. जर आम्ही आमची नागरिकता सिद्ध करू शकलो नाही, तर बांग्लादेशी किंवा रोहिंग्या मुस्लिम ठरवू, अशी धमकीही दिली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सुळे काय म्हणाल्या?
“ही वागणूक देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांच्या बलिदानाची थट्टा आहे. शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी. शेख कुटुंबाला दिलेली धमकी म्हणजे व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हकिमुद्दीन शेख यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनीही सैन्यात सेवा बजावली आहे. तरीही त्यांच्या देशभक्तीवर असा संशय घेणं ही लाजिरवाणी बाब असल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे. हकिमुद्दीन शेख यांचा लष्करी सेवा इतिहास, त्यांचा त्याग आणि कुटुंबाच्या देशाशी असलेल्या निष्ठेबाबत कुणीही शंका घेऊ शकत नाही, असं मत अनेक माजी सैनिकांनीही व्यक्त केलं आहे.