अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बसमधील गर्दीचा फायदा घेत एका तरुणीला अश्लील स्पर्श करणाऱ्या इसमाला त्या तरुणीने चोख प्रत्युत्तर देत सडेतोड धडा शिकवला. ही घटना एका चालत्या बसमध्ये घडली असून, तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. संबंधित तरुणीचा हा धैर्यपूर्ण प्रतिकार अनेकांना प्रेरणा देणारा ठरत आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, बसमध्ये एका तरुणीच्या शेजारी एक इसम बसलेला आहे. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत असताना, तो व्यक्ती हळूहळू तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. तो मुद्दाम कोपराने तिच्या छातीच्या दिशेने हालचाल करत होता. ही गोष्ट त्या तरुणीला व तिच्या सोबत असलेल्या मैत्रिणीला लक्षात येते. त्यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.
पुढे, तरुणी बसमध्येच त्या व्यक्तीच्या कानशिलात मारते आणि मोठ्याने त्याच्यावर आरडा-ओरड करते. त्याच्या अश्लील वर्तनाबद्दल त्याला जाब विचारते. बसमधील इतर प्रवाश्यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्या तरुणीला पाठिंबा दिला. सुरुवातीला स्वतःची चूक नाकारणारा आरोपी शेवटी हात जोडून माफी मागतो.
हा व्हिडीओ ‘@IndiaObserverX’ या ट्विटर (एक्स) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या लाखो नेटकऱ्यांनी तो पाहिला असून, तरुणीच्या धाडसाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. अनेकांनी लिहिलं की अशा विकृत मानसिकतेच्या प्रवाशांना सार्वजनिक ठिकाणीच योग्य धडा मिळायला हवा.
सार्वजनिक ठिकाणी महिलांवरील छेडछाड, अश्लील हावभाव किंवा स्पर्श ही काही नवीन बाब नाही. मात्र, आजच्या महिलांनी अशा घटनांवर मूकव्रत न पाळता थेट कृती करण्याची तयारी दाखवली आहे. याचाच परिणाम म्हणजे अशा व्हिडीओंच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदलाची जाणीव निर्माण होत आहे.