अकोला न्यूज नेटवर्क
मुझफ्फरपूर (बिहार) : मुझफ्फरपूर जिल्ह्यातील गायघाट ब्लॉकमधील भुसारा चौक येथे एका २० वर्षीय मानसिकदृष्ट्या विकलांग तरुणीवर ६५ वर्षीय वृद्धाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री घडलेला हा अमानवी प्रकार स्थानिक दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी त्वरेने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली, जेव्हा भुसारा चौकातील सीएसपी (कस्टमर सर्व्हिस पॉइंट) केंद्राचा ऑपरेटर दुकान उघडण्यासाठी आला. काउंटर अस्ताव्यस्त दिसल्याने चोरीचा संशय घेत त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, फुटेजमध्ये काय दिसलं ते पाहून तो हादरला. ६५ वर्षीय सकल पासवान या वृद्धाने मतीमंद तरुणीवर दुकानातच अत्याचार केल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसत होते.
या घटनेनंतर मुलगी विवस्त्र अवस्थेत चौकात फिरताना आढळून आली. स्थानिक महिलांनी तिला कपडे देऊन आधार दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी दोन दिवसांपासून परिसरात एकटी फिरताना दिसत होती.
फुटेज मिळताच दुकानदाराने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून आरोपी सकल पासवानला अटक केली. तो मूळचा मुझफ्फरपूरचा असून काही दिवसांपूर्वीच हरियाणामधून मजुरीच्या कामावरून गावी परतला होता.
चौकशीदरम्यान आरोपीने सुरुवातीला आपल्या वृद्धत्वाचा हवाला देत दोष नाकारण्याचा प्रयत्न केला. मात्र सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर तो गप्प बसला. पीडितेची वैद्यकीय तपासणी एसकेएमसीएच रुग्णालयात करण्यात आली आहे. पोलिस सध्या तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
एएसपी (पूर्व) सहरेयार अख्तर यांनी घटनेची पुष्टी करत सांगितले की, “ही एक गंभीर घटना आहे. सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाचा वैज्ञानिक पुरावा असून तो न्यायालयात सादर करण्यात येईल.” आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिस अधिकाऱ्यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.