अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ संदर्भातील जाहिरात अखेर प्रसिद्ध केली असून या परीक्षेद्वारे एकूण २८२ पदांची भरती केली जाणार आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की ही परीक्षा राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
यामध्ये राज्य कर निरीक्षक पदासाठी २७९ आणि सहायक कक्ष अधिकारी पदासाठी ३ जागांची भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट असून, चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत २५ ऑगस्टपर्यंत आहे.
अधिकृत सूचना काय सांगते?
आयोगाने स्पष्टपणे नमूद केले आहे की जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या तारखेपर्यंत संबंधित विभागांकडून प्राप्त पदांची माहिती जाहिरातीत दिली आहे. मात्र, भविष्यात शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्र मिळाल्यास त्या आधारे अधिक पदांचा समावेश केला जाईल. त्यामुळे पदसंख्या व आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे.
पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरण्याचा टप्पा असून मुख्य परीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. तसेच, जाहिरातीत नमूद नसलेल्या पदांबाबत तक्रार करता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. कोणताही उमेदवार केवळ सध्याच्या पदसंख्येवरून निर्णय न घेता भविष्यातील वाढीची शक्यता लक्षात घेऊन अर्ज करावा, अशी सूचनाही आयोगाने दिली आहे.
परीक्षा प्रक्रियेबाबत आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अद्यतन दिली जाणार आहेत. त्यामुळे परीक्षार्थींनी अधिकृत माहितीवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.