अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या नव्या यादीत पक्षातील अनेक जुन्या मातब्बर नेत्यांसह काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. मात्र या नियुक्त्यांमुळे काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे सूत्रांकडून समजते.
नवीन कार्यकारिणीत ३६ जणांची राजकीय व्यवहार समिती, १६ वरिष्ठ उपाध्यक्ष, ३८ उपाध्यक्ष, ५ वरिष्ठ प्रवक्ते, १०८ सरचिटणीस, ९५ चिटणीस आणि ८७ सदस्यांची कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली आहे. ही यादी मंगळवारी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आली.
राजकीय व्यवहार समितीत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
वरिष्ठ प्रवक्त्यांमध्ये अनंत गाडगीळ, अतुल लोंढे, धीरज देशमुख, गोपाळ तिवारी आणि सचिन सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माध्यम समन्वयक म्हणून पुन्हा एकदा श्रीनिवास बिक्कड यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे.
ही कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीही दिसून आली आहे. काही नेते त्यांच्या नावाच्या क्रमवारीवरून नाराज असल्याचे बोलले जात आहे, तर काहींना अपेक्षेप्रमाणे स्थान न मिळाल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही जिल्ह्यातील युवा पदाधिकाऱ्यांमध्येही असंतोष असून, संघटनात्मक समावेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
दरम्यान, काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीमुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.