अकोला न्यूज नेटवर्क
श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संस्था (NASA) यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘निसार’ उपग्रहाचे आज श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण होणार आहे. NASA-ISRO Synthetic Aperture Radar (NISAR) ही उपग्रह मोहीम पृथ्वी निरीक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ही मोहीम केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरण विषयक अभ्यासात नवे दालन उघडणार आहे.
विशेष बाब म्हणजे, भारताचे GSLV रॉकेट प्रथमच एखाद्या उपग्रहाला सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिटमध्ये स्थापन करणार आहे. या प्रकारच्या कक्षेत उपग्रह दररोज एकाच वेळी पृथ्वीच्या एकाच भागावरून फिरतो, ज्यामुळे सातत्याने अचूक निरीक्षण शक्य होते. सामान्यतः अशा कक्षांसाठी PSLV वापरले जाते, पण निसार उपग्रहाचे वजन अधिक असल्यामुळे यावेळी GSLV ची निवड करण्यात आली आहे.
ISRO चे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी या मोहिमेस अत्यंत महत्त्वाची संज्ञा दिली असून, यामुळे भारताच्या अंतराळ संशोधनात एक नवा टप्पा गाठला जाणार आहे. आतापर्यंत GSLV चा उपयोग केवळ भूस्थिर हस्तांतरण कक्षेसाठी झाला होता, मात्र निसारमुळे याच्या वापरात नवे परिवर्तन होणार आहे.
‘निसार’ उपग्रहाची वैशिष्ट्ये आणि उपयोग:
– दिवस, रात्र आणि कोणत्याही हवामानात निरीक्षण करणारी क्षमता
– दर १२ दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचे सुस्पष्ट मॅपिंग
– पृष्ठभागावरील १ सेंटीमीटर इतके सूक्ष्म बदल नोंदवण्याची क्षमता
– ज्वालामुखी, भूस्खलन, भूकंप यांसारख्या आपत्तींचे भाकीत शक्य
ISRO चे माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी सांगितले की, निसार मुळे नैसर्गिक आपत्तीपूर्वी अचूक नकाशा तयार करता येईल, जे धोका टाळण्यासाठी आणि बचाव यंत्रणांची आगाऊ तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
ही मोहीम भारत आणि अमेरिका यांच्यातील पहिली ‘हार्डवेअर’ भागीदारी असून, नासाने ‘एल-बँड’ तर इस्रोने ‘एस-बँड’ रडार प्रणाली दिली आहे. या दोन्ही रडारमुळे पृथ्वीच्या विविध पृष्ठभागावरील बदल तपशीलात टिपता येतील.
निसारची माहिती जमिनीतील ओलावा, खडबडीतपणा, हालचाल आणि नैसर्गिक रचना यांवर प्रकाश टाकेल. त्यामुळे हवामानशास्त्र, पर्यावरण शास्त्र, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्राला ही मोहीम अनमोल ठरणार आहे. दशकभर सुरू असलेल्या या दोन्ही संस्थांतील सहकार्याचे हे यशस्वी फलित असून, आजची झेप जागतिक विज्ञानाच्या इतिहासात नोंद होईल.