अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रात २०२५-२६ या आर्थिक वर्षात खासगी नोकरदारांच्या पगारात सरासरी ६.२ टक्क्यांपासून ११.३ टक्क्यांपर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज मंगळवारी (दि. २९ जुलै) सादर करण्यात आलेल्या ‘टीमलीज सर्व्हिसेस- जॉब्स अँड सॅलरीज प्रायमर २०२५-२६’ या अहवालातून समोर आला आहे. काही विशिष्ट पदांवर ही वाढ तब्बल १३.८ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
कंपन्यांकडून नेतृत्व विकास, कौशल्यसिद्धता आणि प्रेरणा केंद्रित धोरणांचा स्वीकार केला जात असल्याने रोजगार आणि वेतन धोरणांमध्ये मोठे बदल होत आहेत. टीमलीज सर्व्हिसेसचे सीईओ (स्टाफिंग) कार्तिक नारायण यांनी स्पष्ट केलं की, तांत्रिक कौशल्यांवरील भूमिकांची मागणी वाढत असल्याने हे प्रमाण अधिक स्पष्ट होत आहे.
२३ उद्योग क्षेत्रे आणि २० प्रमुख शहरांतील १,३०८ नियोक्त्यांच्या डेटावर आधारित या अहवालात विविध पदांवरील पगारवाढीचा आढावा देण्यात आला आहे. विशेषतः इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर (११.३%), कन्झ्युमर ड्युरेबल्स (१०.७%), रिटेल (१०.७%) आणि एनबीएफसी (१०.४%) क्षेत्रात सर्वाधिक वाढ अपेक्षित आहे.
पदांनुसार सर्वाधिक पगारवाढ मिळणाऱ्यांमध्ये, EV डिझाइन इंजिनिअर (१२.४%), कन्झ्युमर ड्युरेबल्समधील इन-स्टोअर डेमॉन्स्ट्रेटर (१२.२%), एनबीएफसीतील रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह (११.६%) आणि रिटेलमधील फॅशन असिस्टंट (११.२%) यांचा समावेश आहे.
पायाभूत सुविधा, EV उद्योग, रिअल इस्टेट आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील गतीमुळे मेकॅनिक (१०.४%), मटेरियल हँडलर (१०%), मशीन ऑपरेटर (९.९%) आणि इलेक्ट्रिशियन (९.३%) या पदांवरील वेतनातही लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.
काही शहरांमध्ये विशिष्ट पदांवर अपवादात्मक पगारवाढ होणार असून, पुण्यात क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर (१३.८%), हैदराबादमध्ये एमआयएस एक्झिक्युटिव्ह (१३.४%), बंगळुरूमध्ये डेटा इंजिनिअर (१२.९%), मुंबईत इलेक्ट्रिकल डिझाईन इंजिनिअर (१२.६%) आणि गुडगावमधील सेल्स एक्झिक्युटिव्ह (१२.४%) यांना जास्तीत जास्त फायदा होण्याची शक्यता आहे.
हा ट्रेंड नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी कौशल्य वृद्धीचा स्पष्ट संकेत देत असून, नियोक्त्यांसाठी लवचिक व प्रासंगिक भरती धोरणे राबवण्याची गरज अधोरेखित करतो.