अकोला न्यूज नेटवर्क
सांगली : शिराळा (जि. सांगली) येथे आज नागपंचमीचा पारंपरिक आणि थरारक उत्सव मोठ्या जल्लोषात सुरू झाला. मानाच्या नागाची पूजा, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका, नागा साधूंचं आगमन आणि २३ वर्षांनंतर पुन्हा एकदा झालेलं जीवंत नाग दर्शन यामुळे संपूर्ण गाव नागभक्तीच्या रंगात न्हालं आहे.
कोतवालांनी आणलेल्या मातीच्या नागाची महाजन यांच्या घरी पूजा झाल्यानंतर मानाच्या पालखीची मिरवणूक अंबामाता मंदिराच्या दिशेने निघाली. या पारंपरिक उत्सवात आमदार सत्यजित देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांच्यासह हजारो नागभक्त सहभागी झाले होते. यावर्षी प्रथमच जय जिजाऊ महिला मंडळाच्या महिलांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून अंबामाता मंदिरात दर्शन घेतले.
शिराळा गावाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे नाग पूजन. गेल्या अनेक वर्षांपासून जीवंत नाग पकडण्यावर बंदी होती. मात्र, यंदा केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाने २१ नागरिकांना शैक्षणिक आणि जनजागृतीच्या उद्देशाने नाग पकडण्याची परवानगी दिली आहे. वन विभागाच्या देखरेखीखाली ठिकठिकाणी नागप्रदर्शनातून प्रबोधन केले जात आहे.
नागा साधूंनी भस्म, कवट्यांची माळ, जटाजूट आणि अंगावर नाग घेऊन केलेला आगमन सोहळा संपूर्ण मिरवणुकीचं आकर्षण ठरला. नागपंचमीची ही मिरवणूक म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि प्रबोधन यांचं अनोखं मिश्रण ठरलं आहे.