अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत पहलगाम अतिरेकी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांचा खातमा केल्यानंतर संपूर्ण देशात चर्चेला उधाण आलं असताना, अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे. “धर्माच्या नावाखाली 28 लोकांसाठी सिंदूर यात्रा काढली जाते, पण 6 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं सिंदूर गमावलं, त्यांच्यासाठी सरकारकडून साधी श्रद्धांजलीदेखील मिळत नाही,” असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
बच्चू कडू म्हणाले, “सहा लाख हिंदू माता-भगिनींचा सिंदूर उडाला, त्यांच्यासाठी सरकार गप्प का? महादेवाचा त्रिशूल शेती करताना शेतकऱ्याच्या छाताडात घुसतो आहे, हे सरकार बघतंय पण बोलत नाही.” त्यांनी सत्ताधाऱ्यांवर धर्माच्या नावाने राजकारण केल्याचा आरोप करत “लोकांना केवळ धार्मिक विषयांत गुंतवून, त्यांच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित केलं जातं,” असं स्पष्ट केलं.
तसेच, भाजपकडून विरोधी पक्षांवर दबाव तंत्र वापरलं जात असल्याचा दावा करत बच्चू कडू म्हणाले, “हा सगळा खेळ भाजपचा आहे. मित्र पक्षांना संभ्रमात ठेवून राजकीय संकेत दिले जात आहेत. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, यातून सूक्ष्म राजकारण खेळलं जातंय.”
“‘तुम हट गये तो मेरे पास पवार साहेब और उद्धव साहेब आहे’, असं वातावरण तयार केलं जातंय. म्हणजेच, भाजप युतीत नसलेल्या नेत्यांनाही अप्रत्यक्षपणे आपल्याकडे असल्याचा संकेत देत आहे. यामुळे विरोधी पक्षांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न आहे,” असं ते म्हणाले.