अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील दैनंदिन आर्थिक व्यवहार, बँकिंग सेवा आणि इंधन दरांशी संबंधित अनेक नियम 1 ऑगस्ट 2025 पासून बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या मासिक खर्चावर होण्याची शक्यता आहे. UPI व्यवहार, SBI क्रेडिट कार्ड विमा, एलपीजी सिलिंडरचे दर आणि आरबीआयचे संभाव्य व्याजदर हे या बदलांचा केंद्रबिंदू ठरणार आहेत.
UPI व्यवहारांवर नवीन मर्यादा:
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आता एका UPI अॅपमधून दिवसात केवळ 25 वेळा शिल्लक तपासता येईल. तसेच, OTP आधारित व्यवहार दिवसात फक्त तीन वेळच्या निश्चित सत्रांमध्येच होणार आहेत – सकाळी 10 वाजेपर्यंत, दुपारी 1 ते 5 आणि रात्री 9.30 नंतर.
SBI क्रेडिट कार्ड विमा बंद:
SBI ने ELITE आणि PRIME को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर लागू असलेले विमान अपघात विमा संरक्षण 1 ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पूर्वी मिळणारे 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे संरक्षण आता लागू नसेल. हा निर्णय SBI-UCO, सेंट्रल बँक आणि करूर वैश्य बँक यांच्या सहकार्याने जारी कार्ड्सवर लागू असेल.
एलपीजी आणि इंधन दरांमध्ये संभाव्य बदल:
तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींचा आढावा घेतात. जुलै महिन्यात व्यावसायिक सिलिंडर 60 रुपयांनी स्वस्त झाला होता, तर घरगुती सिलिंडरचे दर स्थिर होते. आता 1 ऑगस्टपासून घरगुती वापरकर्त्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत गेल्या वर्षभरात सीएनजी 79.50 रुपये प्रति किलो, तर पीएनजी 49 रुपये प्रति युनिट दराने विकले जात आहे.
आरबीआय व्याजदर निर्णय:
4 ते 6 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत आरबीआय कडून नवीन व्याजदर धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज, आणि अन्य कर्जाच्या EMI मध्ये बदल होऊ शकतो.