WhatsApp

राहुल गांधींचा मोठा निर्णय: पाकिस्तानच्या हल्ल्यात पालक गमावलेल्या २२ मुलांना घेतलं दत्तक

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाक संघर्षात सीमेलगतच्या भागात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्यात पालक गमावलेल्या २२ मुलांना काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलांच्या शिक्षणाचा आणि संगोपनाचा संपूर्ण खर्च राहुल गांधी उचलणार आहेत. पूंछ जिल्ह्यातील या मुलांना आता पदवीपर्यंत शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा पहिला हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.



जम्मू-कश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष तारिक हमीद कर्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या २२ मुलांपैकी बहुतेकांनी वडिलांना—कुटुंबातील कमावत्या सदस्यांना—गोळीबारात गमावले आहे. यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन राहुल गांधींनी ही जबाबदारी स्वीकारली. या मुलांना त्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधी यांनी मे महिन्यात पूंछला दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांना या दहशतवादी हल्ल्यात अनाथ झालेल्या मुलांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अधिकृत सरकारी नोंदींच्या आधारे यादी तयार करण्यात आली.

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत प्रत्युत्तर दिलं. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरूच राहिला. या गोळीबारात धार्मिक शिक्षणसंस्था ‘झिया उल उलूम’च्या परिसरात अनेक विद्यार्थी जखमी झाले. विहान भार्गव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. काहींनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील आधार गमावला.

Watch Ad

राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा हा निर्णय भावनिक आणि माणुसकीचा एक वेगळा चेहरा समोर आणणारा ठरत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!