WhatsApp

डॉक्टर झोपले अन् रुग्ण तडफडत राहिला; उपचाराअभावी मृत्यू

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील एलएलआरएम मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचाराअभावी एका गंभीर रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डॉक्टर टेबलावर पाय ठेवून झोपलेले दिसत असून, समोर स्ट्रेचरवर रुग्ण रक्ताच्या थारोळ्यात तडफडताना दिसतो. हा प्रकार घडतोय राज्यातील प्रमुख सरकारी रुग्णालयात, जिथे २४ तास आपत्कालीन सेवा देण्याचे आश्वासन आहे.



मृत रुग्णाचे नाव सुनील असून तो हसनपूर गावचा रहिवासी होता. रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला एलएलआरएम रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र डॉक्टर झोपेत असल्याने उपचार मिळाले नाहीत, आणि सुनीलने उपचाराअभावी प्राण गमावले, असा आरोप नातेवाईकांनी केला.

या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून जनतेच्या संतापाला ऊत आला आहे. व्हिडिओमध्ये ऑर्थोपेडिक्स विभागाचे डॉ. भूपेश कुमार राय आणि ज्युनियर डॉक्टर अनिकेत झोपलेले स्पष्टपणे दिसत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी वेळेवर उपचार न झाल्याची तक्रार केली.

मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.सी. गुप्ता यांनी सांगितले की, व्हिडिओची गंभीर दखल घेण्यात आली असून दोन्ही डॉक्टरांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय, तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कडक कारवाई केली जाईल.

या प्रकारामुळे सरकारी वैद्यकीय यंत्रणांवरील विश्वास डळमळीत झाला असून, अपात्कालीन सेवा आणि डॉक्टरांची जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. रुग्णालय प्रशासनाने जरी कारवाई केली असली, तरी पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी जनतेतून तीव्र मागणी केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!