अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमारेषा ओलांडून १०० किमी आत घुसून “ऑपरेशन सिंदूर” राबवले. या मोहिमेत पाकिस्तानमधील ११ हवाई तळ लक्ष्य करण्यात आले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी लोकसभेत दिली. त्यांनी स्पष्ट केले की, हा हल्ला केवळ राजकीय भाषणाचा विषय नसून, भारतीय सैन्याच्या प्रत्यक्ष कारवाईचा गंभीर भाग आहे.
या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयक्षमतेचे कौतुक करत विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी विदेश दौरा तात्काळ रद्द केला आणि देशात परतून सुरक्षा यंत्रणांची बैठक घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पांवर थेट कारवाईचा निर्णय घेतला गेला, असे शाह यांनी सांगितले.
त्यांनी लोकसभेत सांगितले की, “मोदींनी केवळ कडक शब्दांत निषेध केला नाही, तर थेट कृती केली. काँग्रेस सरकारने केलेल्या सिंधु जल करारावरही तात्पुरती स्थगिती आणली आणि पाकिस्तानच्या नागरिकांसाठी सार्क व्हिसाही निलंबित केला.”
याच भाषणात शाह यांनी २४ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या भाषणावरूनही विरोधकांवर टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की, “ते भाषण प्रचारासाठी नव्हते. ते देशवासीयांच्या भावना व्यक्त करणारे होते. विरोधकांना जर ते भाषण प्रचारचं वाटत असेल, तर त्यांच्या विचारसरणीवरच शंका घ्यावी लागेल.”
यावेळी शाह यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराच्या विशेष तुकड्यांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक निशाणा साधला. “११ हवाई तळांवर धडक कारवाई झाली असून, ही संपूर्ण मोहीम अत्यंत गुप्ततेत आणि यशस्वीरीत्या पार पडली,” असे त्यांनी नमूद केले.
अमित शाह यांच्या या विधानानंतर संसदेत जोरदार चर्चेला उधाण आले असून, विरोधकांनी या मोहिमेची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. मात्र, गृहमंत्र्यांच्या भाषणाने सरकारने घेतलेल्या ठोस भूमिकेची झलक समोर आल्याचे स्पष्ट झाले आहे.