अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील खराडी परिसरात रेव्ह पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या बचावासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे थेट मैदानात उतरले आहेत. पुणे पोलिसांच्या कारवाईवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित होती का, असा संशय व्यक्त केला आहे.
रविवारी रात्री पुण्यातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये सात जणांच्या उपस्थितीत पार्टी सुरू होती. यावेळी पोलिसांनी छापा टाकून अंमली पदार्थ जप्त केल्याचा दावा केला आहे. यानंतर खेवलकर यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली. मात्र या कारवाईवर आता राजकीय वादंग निर्माण झाला आहे.
“सात जण एका ठिकाणी एकत्र आले की त्याला रेव्ह पार्टी म्हणतात का? ना मोठा गोंधळ, ना संगीत, ना नृत्य – मग ही रेव्ह पार्टी कशी? देशभरात रोज अशा अनेक खाजगी गेट-टुगेदर होतात. मग फक्त येथेच रेव्हचा ठपका का?” असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.
खडसेंचे पोलिसांना आठ प्रश्न
खडसे म्हणाले की, पोलिसांनी ज्या पद्धतीने व्हिडिओ माध्यमांतून प्रसिद्ध केला, तो खाजगी आयुष्यातील हस्तक्षेप आहे. पोलिसांना चेहर्यांचे व्हिज्युअल दाखवण्याचा कायदेशीर अधिकार नाही, मग ते व्हिडिओ प्रसारित करण्यामागे हेतू काय होता? हे पोलिसांचं वर्तन बदनामीकारक आहे का, असा सवाल त्यांनी विचारला.

तसेच, डॉ. प्रांजल खेवलकर हे वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व असून, त्यांच्याकडे कोणताही अंमली पदार्थ सापडलेला नाही. उलट, एका महिलेसोबत आलेल्या मुलीच्या पर्समध्ये २.७ ग्रॅम पदार्थ आढळल्याचा पोलिसांचा दावा आहे. मग त्या मुलीला पहिल्या क्रमांकाची आरोपी का ठरवले गेले नाही? असा मुद्दाही खडसे यांनी उचलून धरला. खेवलकरांना साक्षीदार म्हणून हाताळले पाहिजे होते, असेही ते म्हणाले.
खडसे यांच्या या भूमिकेमुळे प्रकरणात राजकीय अंगाने नवे वळण घेतले आहे. खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती असून, त्यामुळे कारवाईमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप खडसे अप्रत्यक्षपणे करताना दिसले.