नवी दिल्ली : लाडकी बहीण योजनेअंतर्गत ४ हजार ८०० कोटी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर थेट आरोप करत या योजनेच्या व्यवहारावर एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली. तसेच, संपूर्ण प्रकरणाची श्वेतपत्रिका सादर करून ऑडिट करण्याचेही आवाहन केले.
सुळे म्हणाल्या, “या योजनेचा उद्देश चांगला असला तरी सरकारने त्यात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट होते. २ कोटी ३८ लाख महिलांना लाभ देण्यात आला, त्यापैकी २६ लाख म्हणजे १० टक्के महिलांना निवडणुकीनंतर अचानक अपात्र ठरवण्यात आलं. मग ते पहिल्याच टप्प्यात का ठरवले नाहीत?” योजनेच्या माध्यमातून काही पुरुषांच्या खात्यातही पैसे गेल्याचे उघड झाले असून, अशा गोंधळाबद्दल सरकारला उत्तर द्यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, डिजिटल प्रणाली असतानाही पुरुषांनी भरलेले अर्ज तांत्रिक पद्धतीने अपात्र का ठरवले गेले नाहीत, हा मोठा प्रश्न असून हे संपूर्ण प्रकरण केवळ निवडणुकीपूर्वीचा राजकीय डाव असल्याचा आरोप सुळे यांनी केला. शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या इतर योजनांमधून कपात करून ही योजना राबवण्यात आली आणि त्याचा उपयोग निवडणुकीसाठी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीतील अकार्यक्षमता आणि इतर सामाजिक योजनांमध्ये दुर्लक्ष होत असताना “लाडकी बहीण” योजनेच्या आड ४८०० कोटींचा गैरवापर गंभीर आहे, अशी टीका करत सुळे यांनी सरकारला संसदेतही घेरण्याचा इशारा दिला.