अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभेत सोमवारी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात सुरू असलेल्या चर्चेवेळी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारला थेट सवाल करत पाकिस्तानविरोधी धोरणात दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला. “ज्याच्याशी व्यापार, चर्चा, वाहतूक बंद केली, त्याच्याशी क्रिकेट कसे खेळतो?” असा रोखठोक प्रश्न उपस्थित करत ओवैसींनी सरकारवर तीव्र टीका केली.
पहलगाम येथे एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या पार्श्वभूमीवर आगामी आशिया चषकात भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार असून, त्यावर ओवैसींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पंतप्रधान म्हणाले होते की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. मग क्रिकेट कसे चालते?”, असा सवाल त्यांनी केला.
ओवैसी यांनी याप्रकरणी सुरक्षा यंत्रणांच्या जबाबदारीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. “साडेसात लाख जवान, सीआरपीएफ, आयबी असतानाही चार दहशतवादी देशात घुसून हत्या करतात, आणि तरीही कोणीच जबाबदार ठरत नाही?” असा टोला त्यांनी लगावला. त्यांनी केंद्र सरकारवर “ऑपरेशन सिंदूर केलं म्हणजे सर्व माफ झालं” असा दिखावा केल्याचा आरोप केला.
त्यांच्या मते, या घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा केवळ राजकीय लाभासाठी केलेली कारवाई म्हणून ही मोहीम लोक विसरतील, असाही इशारा त्यांनी दिला.