अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार नागेश आष्टीकर यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थेट फोन करून शुभेच्छा दिल्याची माहिती समोर आली असून, या घटनेने हिंगोलीपासून दिल्लीपर्यंत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असूनही शाहांकडून त्यांना ना फोन, ना कोणतीही सार्वजनिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळे आता भाजप ठाकरेंच्या खासदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले नागेश पाटील आष्टीकर हे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे खासदार आहेत. त्यांना शाहांनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली. यामुळे हा केवळ औपचारिक फोन होता की मागे काही वेगळं राजकारण लपलंय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
या घटनेनंतर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया देत, “सत्ताधाऱ्यांकडून आमच्या लोकांवर दबाव येतोच. आम्हाला माहितीय कोण कुठे आहे,” असा सूचक इशारा दिला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, “अमित शाहांचा फोन फक्त शुभेच्छांसाठी होता. यात राजकारण शोधू नका,” असे स्पष्ट केलं.
मात्र, गेल्या काही वर्षांत ठाकरे आणि शाह यांच्यातील संबंध चिघळल्याचं अनेक प्रसंगांत दिसून आलं आहे. शिवसेनेच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी शाहांवर वारंवार गंभीर आरोप केले. ‘मातोश्री’ बैठकीचा उल्लेख करत त्यांनी दिलेलं वचन फसवण्यात आलं, असा ठपका ठेवला होता. या पार्श्वभूमीवर आष्टीकरांसारख्या खासदारांशी शाहांचा थेट संवाद म्हणजे संभाव्य राजकीय हलचालींचा भाग असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या काही खासदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. अशा वेळी अमित शाह यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा थेट संपर्क हा नवा राजकीय डाव असू शकतो, अशी टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, विरोधी गटांतील असंतुष्ट खासदारांशी सुसंवाद ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.