अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : खाजगी टॅक्सी अॅप कंपन्यांच्या एकाधिकारशाहीला टक्कर देण्यासाठी आणि मराठी युवकांना नोकरी व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार लवकरच आपलं स्वतःच अॅप आधारित प्रवासी सेवा प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. या माध्यमातून रिक्षा, टॅक्सी आणि ई-बाईक सेवा सरकारमार्फत सुरू करण्यात येणार असून, या अॅपचं नाव ‘जय महाराष्ट्र’, ‘महा-राईड’, ‘महा-यात्री’ किंवा ‘महा-गो’ यापैकी एक ठेवण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईक यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अंतिम मंजुरीनंतर हे अॅप कार्यान्वित होईल. या उपक्रमासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी’ व ‘मित्र’ या संस्थांबरोबर चर्चा सुरू असून, नियमावलीही केंद्र सरकारच्या अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांनुसार अंतिम टप्प्यात आहे.
खाजगी अॅप कंपन्या सध्या चालक व प्रवाशांना वाढीव दरांनी लुटत असून, त्यांना पर्याय म्हणून ही सेवा अत्यंत गरजेची असल्याचं मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं. यासाठी ५ ऑगस्ट रोजी मंत्रालयात तंत्रज्ञ, शासकीय अधिकारी व आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून, अॅपचं अंतिम स्वरूप त्या बैठकीत ठरेल.
या योजनेचा उद्देश केवळ प्रवास सेवा पुरवणे नाही, तर महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुण-तरुणींना स्वावलंबी बनवण्याचा आहे. यासाठी मुंबई बँकेमार्फत १० टक्के व्याजदराने वाहन खरेदीसाठी कर्ज देण्यात येणार असून, विविध महामंडळांच्या माध्यमातून व्याज परतावा अनुदान देखील मिळणार आहे. त्यामुळे कर्ज जवळपास बिनव्याजी ठरेल, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.
राज्य सरकारच्या या नव्या अॅपमुळे मराठी युवकांना ड्रायव्हिंग, उद्योजकता आणि डिजिटल यंत्रणेत संधी मिळणार आहे. खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला चपराक देणारा हा उपक्रम प्रवाशांसाठीही आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.