अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संसदेत जोरदार चर्चा सुरू असताना शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारला अनेक कठोर प्रश्न विचारले. ‘त्या दिवशी घटनास्थळी एकही जवान का नव्हता? आदेश कोणी दिला?’ या मुद्द्यांवरून त्यांनी थेट केंद्रावर टीका केली.
सावंत म्हणाले, “पहलगाम येथे २६ निरपराध पर्यटकांची हत्या झाली. त्या दिवशी त्या ठिकाणी एकही पोलीस किंवा सशस्त्र जवान उपस्थित नव्हता. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगतो, जेव्हा मी मंत्री म्हणून काश्मीर दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा प्रत्येक ठिकाणी जवानांची सुरक्षा होती. मग त्या दिवशी ती हटविण्यात का आली? कोणी आदेश दिला? याची सखोल चौकशी झाली पाहिजे.”
‘ऑपरेशन सिंदूर’चे नावही त्यांनी चर्चेत घेत टीका केली. “सिंदूर हे आपल्या भगिनींचं प्रतीक आहे, आणि त्यांच्या सिंदूरावरच हल्ला झाला. अशा वेळी ऑपरेशनला ‘सिंदूर’ नाव देणं म्हणजे लोकांच्या भावना दुखावणं आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपांवर अलीकडे आलेल्या न्यायालयीन निर्णयावरूनही सावंत यांनी दहशतवादावरील कारवाईतील त्रुटी दाखवून दिल्या. “१९ वर्ष तुरुंगात ठेवून शेवटी निर्दोष सोडले जातात, याचा अर्थ आपण खरे दहशतवादी ओळखू शकत नाही,” असा आरोप त्यांनी केला.
पुलवामा हल्ल्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका करत गृहमंत्रालयाच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सत्यपाल मलिक वारंवार सांगत होते की जवानांना हवाई मार्गाने पाठवा, पण सरकारने ऐकलं नाही. परिणामी ४० जवान हुतात्मा झाले. तरीही आजवर चौकशी झाली नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव न घेता टोला लगावला. “तुम्ही बिहारमध्ये प्रचारासाठी जाता, पण पहलगाम किंवा मणिपूरमध्ये पीडितांच्या भेटीसाठी का जात नाही?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह लावले.