अकोला न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुरोगामी विचारांची ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अंधश्रद्धेचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीपासून सोडचिठ्ठी मिळावी आणि त्याच्या आयुष्यातील दोन महिलांसह तिघांवर संकट येऊन त्यांचं आयुष्य उध्वस्त व्हावं, यासाठी एका महिलेनं स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याचा प्रकार भुदरगड तालुक्यातील कुर परिसरात समोर आला आहे. या घटनेमुळे गावात भीती आणि संतापाची लाट उसळली आहे.
कुर गावातील स्मशानभूमीत एका नागरिकाच्या अंत्यविधीच्या तयारीदरम्यान हा प्रकार उघड झाला. स्मशानात स्वच्छता करत असताना काही व्यक्तींना बाहुली, नारळ, लिंबू, गुलाल, लोखंडी खिळे आणि एक हाताने लिहिलेला कागद सापडला. कागद उघडून पाहिल्यावर त्यावर एका महिलेचं नाव नमूद करत “सोडचिठ्ठी द्यावी” असा मजकूर लिहिलेला होता. त्याखाली आणखी तिघांची नावं देत “त्यांची वाट लागू द्या” अशी उल्लेखनीय आणि भयावह भाषा वापरलेली होती.
या अघोरी टोनग्यामुळे गावात उलटसुलट चर्चा रंगल्या असून, अंधश्रद्धेच्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. याआधीही गावात रस्त्यावर लिंबू-मिरची, राखेचे ठसे आणि गुलाल यासारख्या घटनांची नोंद झाली होती, पण स्मशानात थेट नाव घेऊन असा टोणगा केल्याची ही पहिलीच वेळ असल्याने खळबळ माजली आहे.
स्मशानभूमीमध्ये करण्यात आलेल्या अशा अघोरी प्रकारांची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा आणि अंधश्रद्धेच्या मुळावर घाव घालण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशीही स्थानिकांची अपेक्षा आहे.