WhatsApp

हुंड्यासाठी विवाहितेचा मृत्यू! बीडमध्ये ‘वैष्णवी’नंतर अनमनेही आयुष्य संपवलं

Share

अकोला न्यूज नेटवर्क
बीड : पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर राज्यात विवाहितांवरील सासरच्या छळाचे अनेक प्रकार उघड होत असताना, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत आणखी एका विवाहितेच्या मृत्यूची धक्कादायक घटना उघड झाली आहे. फक्त २० वर्षांची अनम शेख हिने सासरच्यांच्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे तिच्या पाठीमागे फक्त पाच महिन्यांचा चिमुकला मुलगा राहिला आहे.



अनमचा विवाह २०२३ मध्ये अंबाजोगाईच्या गांधीनगर येथील सोहेल अफसर शेख याच्याशी झाला होता. विवाहावेळी मानपान, दागिने आणि संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही सासरच्यांकडून तिच्यावर सतत माहेरून पैसे आणण्याचा दबाव होता. तिच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पती सोहेल शेखला लग्नानंतर काही महिन्यांतच दारूचे व्यसन लागले आणि त्यानंतर त्याने अनमच्या दागिन्यांचा वापर घरखर्चासाठी केला.

दागिन्यांचे पैसेही संपल्यानंतर, माहेरहून पैसे आणण्यासाठी अनमवर मानसिक आणि शारीरिक छळ सुरु झाला. तिचे पती, दिर मझहर शेख आणि जाऊ तन्नो शेख यांनी तिच्यावर चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत त्रास दिला. तिच्या माहेरच्यांनी अनेकदा मध्यस्थी करत पतीला पैसेही दिले, परंतु छळ थांबला नाही.

२४ जुलै रोजी पतीने तिच्या आईकडे पुन्हा ३० हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न मिळाल्यामुळे तो संतप्त झाला होता. यानंतर २६ जुलैच्या मध्यरात्री अनमच्या सासरच्यांनी तिला विषारी औषध दिल्याचे सांगितले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात पती सोहेल शेख, दिर मझहर शेख आणि जाव तन्नो शेख यांच्याविरोधात कलम ३०६, ४९८(अ) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पीएसआय रवीकुमार पवार करत आहेत.

या घटनेनंतर पुन्हा एकदा हुंडा, व्यसनाधीनता आणि स्त्रीविरोधी छळाच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सामाजिक पातळीवर कठोर पावले उचलण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!