अकोला न्यूज नेटवर्क
बुलढाणा : “देव तारी त्याला कोण मारी” हे वाक्य बुलढाण्यातील लोणार परिसरात खरं ठरलं. येथे एका चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून डोहात उडी घेतली. ही घटना लोणार शहराबाहेरील घरकुल परिसरात घडली असून, पोलिसांच्या या धाडसी कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनास्थळी लोणार पोलीस स्टेशनचे बीट जमादार संतोष चव्हाण आणि पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर निकष हे नियमित पेट्रोलिंग करत होते. ते घरकुल परिसरातून परतत असताना त्यांना एका डोहाजवळ एक मुलगा घाबरून ओरडताना दिसला. त्याचवेळी डोहात दुसरा चिमुकला बुडताना त्यांच्या नजरेस पडला.
क्षणाचाही विलंब न करता पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर निकष यांनी तात्काळ पाण्यात उडी घेतली. काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर त्यांनी त्या चिमुकल्याला सुखरूप डोहाबाहेर काढले आणि त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. ही घटना पाहून उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या प्रसंगावधानाचे आणि धाडसाचे कौतुक केले.
चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले असून, या घटनेनंतर संतोष चव्हाण आणि ज्ञानेश्वर निकष या दोघांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. डोहाजवळ कुठल्याही सुरक्षाव्यवस्थेचा अभाव होता, याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या प्रसंगाने पुन्हा एकदा पोलिसांची जनतेसाठी असलेली तत्परता आणि सेवा भाव अधोरेखित केला आहे. ही घटना एखाद्या सिनेमातील प्रसंग वाटावा अशी असली, तरी ती प्रत्यक्षात घडल्याने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासाची भावना वाढली आहे.