अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २६ निष्पाप पर्यटकांच्या हत्येनंतर भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या अमानवी हल्ल्यानंतर ६ आणि ७ मे रोजी भारतीय सैन्याने हे ऑपरेशन राबवले. यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईतील बारकावे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लोकसभेत उघड केले.
राजनाथ सिंह म्हणाले, “पहलगाममधील हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा होता. धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली गेली. त्या सर्व मृतांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.” या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने तिन्ही दलप्रमुखांची बैठक घेतली आणि प्रतिउत्तरासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ची आखणी करण्यात आली.
ऑपरेशनपूर्वी बारकाईनं नियोजन, हल्ला फक्त दहशतवाद्यांवर
या कारवाईपूर्वी भारतीय लष्कराने अनेक पर्यायांचा विचार केला होता. राजनाथ सिंह यांच्या म्हणण्यानुसार, “सामान्य नागरिकांचे प्राण वाचवत फक्त दहशतवाद्यांवर टार्गेटेड हल्ला करण्याचा मार्ग निवडण्यात आला. आपल्या हल्ल्याचा उद्देश फक्त दहशतवाद्यांचा खात्मा होता.”
रात्रीच्या अंधारात ९ तळांवर अचूक हल्ले
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ६ आणि ७ मेच्या रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील गुलपूर, बर्नाला, तसेच पाकिस्तानातील बहावलपूर, मेहमुनाजोया यांसारख्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. ही कारवाई अवघ्या २२ मिनिटांत पार पडली आणि त्यात लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीनसह पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनांचे १०० हून अधिक अतिरेकी, ट्रेनर आणि हँडलर मारले गेले.
“दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं”
लोकसभेत बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले, “ही केवळ सैनिकी कारवाई नव्हती, तर दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांना दिलेला इशारा होता. ज्या भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, त्यांच्या अश्रूंना उत्तर देण्यासाठी भारतानं त्यांच्या घरात घुसून हिशोब केला.”
पाकिस्तानवर पुन्हा ठपका
राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे पाकिस्तानवर थेट आरोप करत सांगितलं की, “हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा यांना पाकिस्तानच्या सेनेचा आणि ISI चा थेट पाठिंबा आहे. त्यामुळे भारताने आता संयमाची परिसीमा ओलांडल्यावरच हे पाऊल उचलले.”
सर्वसामान्यांमध्ये संताप आणि सैन्याच्या कारवाईला पाठिंबा
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यावर ‘ऑपरेशन सिंदूर’ने दिलेलं उत्तर सर्वसामान्य जनतेला समाधान देणारं ठरलं. सैन्याच्या या कारवाईचं अनेकांनी सोशल मीडियावर आणि संसदेच्या माध्यमातूनही जोरदार स्वागत केलं.