अकोला न्यूज नेटवर्क
नागपूर : सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात सोनेरी अध्याय लिहिला आहे. जॉर्जियातील बातुमी येथे झालेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिव्याने थरारक विजय मिळवत एक अनोखा पराक्रम साधला आहे. वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी आणि ती स्पर्धा जिंकणारी दिव्या ही पहिली भारतीय ठरली असून, तिच्या या कामगिरीने देशभरात अभिमानाची लाट उसळली आहे.
२०१३ मध्ये सर्वात कमी वयाची ‘वुमन फिडे मास्टर’ बनलेल्या दिव्याने वयाच्या ५ व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली होती. नागपूरच्या एका लहानशा वसाहतीतून प्रवास सुरू करून आज ती जगाच्या बुद्धिबळ पटलावर आपली छाप पाडत आहे. तिच्या आईवडिलांनी (डॉ. जितेंद्र आणि नम्रता देशमुख) दिलेल्या प्रोत्साहनामुळे ती या खेळाकडे वळली आणि त्याच मार्गावर तिचा कसोटीचा प्रवास सुरू झाला.
२०१२ मध्ये पुदुचेरी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या दिव्याने २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील अंडर-१० वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून जागतिक स्तरावर पहिलं यश मिळवलं. तेव्हापासून तिने ४० हून अधिक वेळा भारताचं प्रतिनिधित्व केलं असून ३५ वेळा पदक जिंकण्यात यश मिळवलं – त्यात २३ सुवर्ण आहेत.
वर्ष २०२० मध्ये ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या विजयी संघाचा भाग असलेली दिव्या, यानंतर फिडे इंटरनॅशनल मास्टर बनली आणि २०२५ मध्ये तिने आपला तिसरा ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केला. परिणामी ती भारताची चौथी वुमन ग्रँडमास्टर ठरली. याआधी केवळ कोनेरू हंपी, हरिका द्रोणावल्ली आणि वैशाली रमेशबाबू यांनाच हा किताब मिळाला होता.
वयाच्या १७ व्या वर्षी दिव्याने दोन वेळा राष्ट्रीय महिला विजेतेपद पटकावले. त्यानंतर कझाकस्तान येथे वुमेन्स कॉन्टिनेंटल स्पर्धेत आशियाई विजेतेपद मिळवत तिने बुद्धिबळ विश्वातील आपले वर्चस्व सिद्ध केले. २०२४ मध्ये U-20 वर्ल्ड जूनियर स्पर्धेत ११ पैकी १० गुणांसह विजेतेपद पटकावले आणि तिचे तिसरे जागतिक जेतेपद पटकावले.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्या ही भारतातील आणि जगातील ज्युनियर बुद्धिबळपटूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तिचा खेळ नेहमीच शांत, संयमी आणि रणनीतीप्रधान असतो. “एकवेळी एक स्पर्धा” हा तिचा दृष्टिकोन असून ती प्रत्येक सामन्याला स्वतंत्र महत्त्व देते.
दिव्याच्या यशामध्ये केवळ कौशल्य नव्हे तर सातत्यपूर्ण सराव, समर्पण आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आहे. विश्वनाथन आनंद यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे तिचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. तिच्या भविष्यातील उद्दिष्टांमध्ये कॅन्डिडेट्स स्पर्धेत यश मिळवून जागतिक विजेतेपदासाठी दावेदारी मजबूत करणे हे आहे.
दिव्याचा हा ऐतिहासिक विजय केवळ तिचा वैयक्तिक यशस्वी प्रवास नव्हे, तर भारतीय महिलांच्या बुद्धिबळातील सहभागासाठीही एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे. तिच्या या कामगिरीने नागपूरसह संपूर्ण देशाला अभिमान वाटत असून, भविष्यात तिने आणखी मोठी यशं मिळवावीत, अशीच अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.