अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यंदा मात्र मैदानावरील खेळीमुळे नव्हे, तर त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असताना, गांगुली यांनी आशिया कप २०२५मधील भारत-पाक सामन्यावर मत व्यक्त करताना “खेळ सुरूच राहिला पाहिजे” असे म्हटले. यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना गांगुली म्हणाले, “मला भारत-पाकिस्तान सामन्यात काहीच अडचण नाही. जे पहलगाममध्ये घडलं ते दुर्दैवी आहे, पण खेळ थांबायला नको. दहशतवाद थांबवणं महत्त्वाचं आहे आणि भारताने त्याबाबत कठोर पावले उचलली आहेत.” मात्र, देशभरात चालू असलेल्या भावनांच्या पार्श्वभूमीवर गांगुलीचं हे वक्तव्य अनेकांना खटकलं.
२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू पाणी करार रोखणे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे यांसारखे कडक निर्णय घेतले.
या घटनांमुळे देशभरात पाकिस्तानविरोधी भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे अनेक भारतीय नेटकऱ्यांनी गांगुलीच्या “खेळ सुरू राहावा” या मतावर आक्षेप घेत, “देशाच्या सुरक्षेपेक्षा क्रिकेट मोठं का?” असा सवाल विचारला. काहींनी “लाज वाटू दे” असे म्हणत त्यांना लक्ष्य केले.
दरम्यान, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२५ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरोधात मैदानात उतरायला नकार दिला होता. त्यामुळे सामनाच रद्द करण्यात आला. या पार्श्वभूमीवर गांगुलीचे वक्तव्य काँग्रेस आणि भाजपसह अनेक राजकीय आणि सामाजिक गटांनी चुकीचे ठरवले आहे.