अकोला न्यूज नेटवर्क
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या लिडवास भागात सोमवारी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या मोठं ऑपरेशन राबवत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कारवाई ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत झाली असून सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, लिडवास हा डोंगराळ आणि घनदाट जंगलांचा परिसर आहे, जो त्राल क्षेत्राशी जोडतो. याठिकाणी टीआरएफ या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या हालचाली गेल्या काही आठवड्यांपासून सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती.
दछिगाम जंगल भागात सोमवारी सकाळी अचानक गोळीबार सुरू झाला. सुरक्षादलांनी तत्काळ प्रतिसाद देत परिसर सील केला. यानंतर झालेल्या जोरदार चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचे लष्कराच्या चिनार कॉर्प्सने जाहीर केले. या दहशतवाद्यांमध्ये मुसा याचाही समावेश असण्याची शक्यता आहे, जो पहलगाम हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार मानला जात होता.
दछिगाम जंगल हे टीआरएफच्या दहशतवाद्यांचे एक प्रमुख लपण्याचे ठिकाण मानले जाते. यापूर्वीही याठिकाणी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी येथे संशयास्पद हालचाली आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश दिले असून, परिसरात मोठ्या प्रमाणात लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ऑपरेशन महादेव अद्याप सुरू असून आणखी दहशतवादी लपले असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.